पंतप्रधान-मुख्यमंत्री भेटीमुळे राज्याचे केंद्र सरकारशी संबंध सुधारतील, वैयक्तिक भेटीवर राऊतांचे मोठे विधान

पंतप्रधान-मुख्यमंत्री भेटीमुळे राज्याचे केंद्र सरकारशी संबंध सुधारतील, वैयक्तिक भेटीवर राऊतांचे मोठे विधान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यातील विषयांवर चर्चा केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. मराठा आरक्षणासह एकुण ११ विषयांवर पंतप्रधान मोदींसोबत चर्चा करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे आणि मोदी भेटतात तर चर्चा सुरु होणारच, राज्यातील अनेक विषयांवर मोदींसोबत चर्चा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनी मोदींसोबत वैयक्तिक भेट घेतली तेव्हा राज्य सरकारमधले प्रमुख शिलेदार बाहेरच उभे होते असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

दरम्यान खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री-पंतप्रधान भेटीवर वक्तव्य केले आहे. ठाकरे आणि मोदी भेटणार तर चर्चा होणारच असे मोठे विधान राऊत यांनी केले आहे. मराठा आरक्षणाचा विषय केंद्र सरकारने सोडवावा अशी मुख्य मागणी आहे. कांजूरच्या मेट्रोची जागा केंद्राची आहे. पदोन्नतीचे आरक्षण अशा अनेक विषयांवर मुख्यमंत्री ठाकरेंनी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली आहे. मोदींनी याबाबत सकारात्मक दृष्टिकोन दाखवला आहे.

मोदी- ठाकरे यांची अर्धा तास वैयक्तिक चर्चा

मुख्यमंत्र्यांसोबत १ तास राज्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली आहे. यानंतर मोदी- ठाकरे यांनी अर्धा तास वैयक्तिक चर्चा केली आहे. या चर्चा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या चर्चांबाबत राजकीय संबंध कोणाला काढायचे आहेत. ते काढू द्या परंतु ठाकरे घराण्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चांगले संबंध आहेत. अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतही मोदींचे चांगले संबंध होते. पंतप्रधान म्हणून त्यांचा नेहमी अदर केला असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

केंद्र सरकार राज्यांचे पालकत्व

नवीन सत्ता समीकरणाचा विषय या वैयक्तिक भेटीमुळे येत नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात चांगला संबंध असायला पाहिजे. केंद्र सरकार राज्यांचे पालकत्व म्हणून काम करत असतं, राज्यांच्या संकटकाळात केंद्र सरकारने मदत करावी ही राज्याची भूमिका आहे. त्यासाठी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यामध्ये चांगला सुसंवाद असावा ही राज्य सरकारची भूमिका राहिली आहे.

संघर्ष हा कायम नसतो

राज्य आणि केंद्राच्या संघर्षाबाबत प्रश्न केला असता संजय राऊत यांनी म्हटले आहे की, संघर्ष हा कायम नसतो केव्हातरी संघर्षाला पुर्णविराम द्यायला लागतो. आज जर पंतप्रधान मोदींनी १ तास महाराष्ट्राच्या समस्या ऐकून घेतल्या आहेत. त्याबाबत सकारात्मक भूमिका दाखवली आहे तर कुठेतरी संघर्ष कमी होत आहे अशाप्रकारेच कमी होत जावा असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नांवर पंतप्रधानांनी कोणाच्याही मध्यस्थिशिवाय लक्ष घातले पाहिजे आणि हेच महत्त्वाचे आहे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

First Published on: June 8, 2021 4:36 PM
Exit mobile version