चोरमंडळानंतर चप्पलचोर, कुंडीचोर, चोरबाजार, चोरगट; सामनातून शिंदे गटाचे पुन्हा वाभाडे

चोरमंडळानंतर चप्पलचोर, कुंडीचोर, चोरबाजार, चोरगट; सामनातून शिंदे गटाचे पुन्हा वाभाडे

संग्रहित छायाचित्र

Sanjay Raut on Shinde Group | मुंबई – विधिमंळाला चोरमंडळ म्हटल्याने कालचे अर्थसंकल्पीय अधिवेशन तुफान वाजले. सत्ताधाऱ्यांनी सभागृहात गोंधळ घालून संजय राऊतांविरोधात हक्कभंग दाखल करून घेतलाच. चोरमंडळ या एका शब्दावरून सभागृहात एवढा गदारोळ झाल्यानंतर शांत बसतील ते संजय राऊत कसले. चोरमंडळानंतर त्यांनी अनेक विशेषणे वापरत शिंदे गटाचे पुन्हा वाभाडे काढले आहेत. सामनाच्या अग्रलेखातून शिंदे गटावर पुन्हा प्रहार करण्यात आलाय.

“रस्त्यांवरील ‘कुंड्या’ आलिशान गाडीत चोरून न्याव्यात त्याप्रमाणे निवडणूक आयोगाबाहेर दिमाखदार गाड्या लावून त्यांनी धनुष्यबाण व शिवसेना चोरून नेली. भाजपचे राज्य असल्यानेच श्रीमंतांना रस्त्यांवरील कुंड्या चोरण्याची विकृती निर्माण झाली, पण हे रस्त्यावरील कुंडीचोर म्हणजे खरी शिवसेना नव्हे. असूच शकत नाही. खरी शिवसेना विधिमंडळ, संसदेच्या बाहेर आहे,” असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

हेही वाचा – चोरमंडळावरून गदारोळ! संजय राऊतांविरोधात हक्कभंग दाखल

“विधिमंडळातील फक्त चाळीस आमदार म्हणजेच शिवसेना, असा निर्णय निवडणूक आयोगातील ईस्ट इंडिया कंपनीच्या एजंटांनी दिला काय आणि या विकतच्या बहुमतवाल्यांनी नाचायलाच सुरुवात केली, पण कितीही नाचकाम केले तरी सर्वोच्च न्यायालयात न्यायासाठी सुनावणी सुरू आहे व न्याय मेला नाही हे लवकरच कळेल. महाशक्तीने निवडणूक आयोग खिशात घातला, पण सर्वोच्च न्यायालय हे मंदिर आहे. त्या मंदिरात चाळीस चप्पलचोरांना थारा नाही,” असंही पुढे अग्रलेखात लिहिण्यात आले आहे.

“दिवसाढवळय़ा चाळीस चोरांनी दरोडा टाकला. चाळीस जणांची चोरांची टोळी हा ‘चोरबाजार’ होऊ शकतो, पण चोरबाजार म्हणजे शिवसेना हे कसे घडेल? चोरांना रस्त्यावर अडवून जनता जागोजागी जाब विचारीत आहे,” अशी टीकाही यामाध्यमातून करण्यात आली आहे.

“विचारांचे रोपटे शिवसेनाप्रमुखांनी लावले तेव्हा विधिमंडळ, लोकसभा, विधिमंडळ पक्ष काय तो अस्तित्वात नव्हते. आमदार-खासदार काय तर नगरसेवकही नव्हते. त्यामुळे विधिमंडळातील फुटीर आमदारांचा ‘चोर गट’ म्हणजेच शिवसेना हा निर्णय बकवास आहे,” अशीही टीका करण्यात आली आहे.

हेही वाचा – नीचपणाची हद्द पार करून…, चित्रा वाघांचा राऊतांवर निशाणा; म्हणाल्या, उद्धव ठाकरेंना चोर…

ती खरी शिवसेना

बच्चू कडूसारख्यांना भररस्त्यात अडवून त्यांची बोलती बंद करण्याची हिंमत दाखवणारा माणूस म्हणजे शिवसेना. रस्त्यावर अडवून, ”चोर-डाकूंबरोबर कसे काय जाता?” असे विचारून चोरांच्या साथीदारांना पळवून लावणारी जनता म्हणजे शिवसेना. शिवसेना कुठल्याही चार भिंतींच्या कोंडवाड्यात नाहीच नाही. ती रस्त्यावर, खुल्या मैदानात उसळते आहे. न्या. चंद्रचूड यांनी नेमके सत्यच सांगितले. निकालाची पर्वा आम्हाला नाही, पण संविधान, सत्य व जनतेचा आवाज मारला जाऊ नये यासाठी हा लढा आहे! घर म्हणजे चार भिंती नाहीत. शिवसेना म्हणजे विधिमंडळ नाही. निकाल हाच आहे!, असंही यात म्हटलं आहे.

First Published on: March 2, 2023 8:46 AM
Exit mobile version