Serum Institute Fire: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा; तातडीने आग विझवण्याचे आदेश

Serum Institute Fire: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा; तातडीने आग विझवण्याचे आदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

देशात कोरोनाची लस पुरविणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला गुरुवारी आग लागली. ज्या इमारतीला आग लागली आहे त्यामध्ये BCG च्या लसी आहेत. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी तिथल्या अधिकाऱ्यांना फोन करुन परिस्थितीचा आढावा घेतला. लवकरात लवकर आग आटोक्यात आणण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी देखील परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्लँटमध्ये लागलेल्या आगीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ दखल घेऊन पुण्यातील यंत्रणेला आग आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगीच्या या दुर्घटनेची विभागीय आयुक्त तसंच मनपा आयुक्तांकडून माहिती घेतानाच आग आटोक्यात आणण्यासाठी आणि आवश्यकता भासल्यास मदत व अनुषंगिक आपत्कालीन उपाययोजना राबविण्यात याव्यात असे निर्देश दिले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान वेळेत पोहचले आहेत. त्यांनी सुरू केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांबाबत समाधान व्यक्त केले आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्लँटला लागलेल्या आगीचे वृत्त समजताच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील संसद सदस्यांच्या समवेत सुरू असलेल्या बैठकीतूनच या घटनेची दखल घेतली व तातडीने कृती करण्याच्या सूचना दिल्या.

हानी टाळणे याला सद्यस्थितीत प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट इमारतीला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु सुरू आहेत. शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या सर्व संबंधित यंत्रणा आग विझविण्याचा आणि मदत कार्य करत आहेत. पुणे आयुक्तांकडून मी यासंदर्भातली माहिती घेतली असून दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात देशातून आणि देशाबाहेरही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात मी स्पष्ट करू इच्छितो की, कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीचा प्रकल्प सुरक्षित असल्याचं मला सांगण्यात आलं आहे. सद्यस्थितीत आग विझवणं आणि दुर्घटनेमुळे होणारी हानी नियंत्रित ठेवणे यास सध्या प्राधान्य देण्यात येत आहे.

 


हेही वाचा – Serum Institute Fire: कोविशिल्ड लस पूर्णपणे सुरक्षित; पुणे पोलीस आयुक्तांची माहिती


 

First Published on: January 21, 2021 5:17 PM
Exit mobile version