धरण उशाला कोरड घशाला मुंबईला पाणी पुरवणार्‍या शहापूरमध्ये यंदाही पाणीबाणी

धरण उशाला कोरड घशाला मुंबईला पाणी पुरवणार्‍या शहापूरमध्ये यंदाही पाणीबाणी

यंदा शहापूर तालुक्यातील ३३४ गावे व ६५२ आदिवासी पाड्यांवर पाणी टंचाईचे सावट असून ७८ गावे ३४२ पाड्यांना बैलगाडी व टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे. यासाठी संभाव्य पाणी टंचाई कृती आराखड्यानुसार सुमारे २२ कोटींचे अंदाजित बजेट तयार करण्यात आले आहे. यंदा फेब्रुवारीत पाणी टंचाई जाणवू लागल्याने ग्रामीण भागातील गाव पाड्यातील लोकांची पाण्यासाठी आता वणवण सुरू झाली आहे. तालुक्यात भातसा, तानसा व वैतरणा ही तीन मोठी धरणे असूनही वर्षानुवर्षे धरण उशाला कोरड घशाला अशी अवस्था पाणी टंचाई ग्रस्त गावांच्या आकडेवारीवरून आजही दिसून येत आहे.

मागील वर्षी ३२५ गावे ६०७ पाड्यांवर पाणी टंचाईचे सावट होते. यासाठी सुमारे १७ कोटी ४९ लाख खर्चाचा पाणी टंचाई कृती आराखडा प्रस्तावित होता. तर यंदा ३३४ गावे व ६५२ पाडे संभाव्य पाणी टंचाई ग्रस्त गावे व पाड्यांचा समावेश कृती आराखड्यातून समोर आल्याने या संख्येत वाढ आणखी वाढ होणार आहे.यंदाच्या संभाव्य पाणी टंचाई कृती आराखड्या नुसार तालुक्यात पहिल्या टप्प्यात जानेवारी ते मार्च महिन्यात ७८ गावे व २४२ पाड्यांना टँकर, बैलगाडीने पाणी पुरवठा करावा लागणार आहे.

तर संभाव्य पाणी कृती आराखड्यानुसार प्रस्तावित केलेल्या उपाययोजनांमध्ये बुडक्या घेणे, विहिरीची खोली करणे व गाळ काढणे, विहीर अधिग्रहण करणे, नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, पूरक नळ पाणी पुरवठा योजना करणे, विंधन विहिरी घेणे व दुरुस्ती करणे ही कामे करण्यात येणार आहेत. या उपाययोजना करण्यासाठी करोडो रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला असला तरी पाणी योजनांबाबतीत ठोस नियोजन नसल्याने दरवर्षी पाणी टंचाई कृती आराखड्यात दिवसेंदिवस गाव पाड्यासह टँकरची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. तर यंदा फेब्रुवारी महिन्यात पाणी टंचाई सुरू झाली असून तालुक्यातील अजनुप ग्रामपंचायत हद्दीतील उठावा, वरचा गायदरा, कोळीपाडा, वारली पाडा या ४ पाड्यासाठी एक टँकर मंजूर झाला आहे. तो तातडीने सुरू करण्याबाबत प्रशासनाने पाणी पुरवठा विभाग पंचायत समिती विभागाला सूचना दिल्याआहेत.

भावली पाणी योजना ठरणार नवसंजीवनी त्यातच तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी तालुक्यातील २८५ गाव- पाड्यासाठी भावली पाणी पुरवठा योजना ही आशेचा किरण ठरणार आहे.

शिवसेनेचे शहापूर विधानसभेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या पाठपुराव्याने व प्रयत्नाने भावली योजना लवकरच मार्गी लागणार आहे ही भावली पाणी पुरवठा योजना प्रत्यक्षात साकार झाल्यास भविष्यात बहुतांशी गावपाड्यांचा पाणी प्रश्न सुटणार आहे.

First Published on: February 19, 2021 2:25 AM
Exit mobile version