BIG BREAKING : शरद पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष, राजीनामा मागे

BIG BREAKING : शरद पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष, राजीनामा मागे

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवड समितीची आज बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या अध्यक्ष निवड समितीने शरद पवारांचा राजीनामा फेटाळला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना एकप्रकारे मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी राजीनामा मागे घेण्याची विनंती केल्यानंतर पवारांनीही विचार करण्यासाठी वेळ मागितला आहे, अशी माहिती राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेतून दिली. यावेळी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत सर्वांनी केलेल्या विनंतीचा मान राखून मी राजीनामा मागे घेत आहे, असं शरद पवार म्हणाले.

‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्र्याच्या पुस्तक प्रकाशनावेळी मी राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर माझ्या या निर्णयाच्या तीव्र भावना उमटल्या. मी निर्णयाचा फेरविचार कारावा, अशी भावना हितचिंतक आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. देशभरातून विशेषत: महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षाचे नेते आणि सहकारी, मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, अशी विनंती केली. लोक माझे सांगाती, हेच माझ्या परीने प्रदीर्घ सार्वजनिक जीवनाचे गमक आहे, माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. पदाधिकारी आणि जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. सर्वांनी केलेल्या विनंतीचा मान राखून मी राजीनामा मागे घेत आहे, असं शरद पवार म्हणाले.

आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलो आहे. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहनं आणि विनंत्या यांचा विचार करून तसेच पक्षाने गठीत केलेल्या समितीने मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे, या निर्णयाचा देखील मान राखून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे, असंही पवार म्हणाले.

अध्यक्षपद स्वीकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्ताधिकारी निर्माण होणे, आवश्यक असते, असे माझे स्पष्ट मत आहे. माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर माझा भर असेल, असंही पवार म्हणाले.


हेही वाचा : पवारांच्या राजीनाम्यामागे राष्ट्रवादीतील फुटीचं कारण? जयंत पाटलांच मोठं वक्तव्य


 

First Published on: May 5, 2023 5:52 PM
Exit mobile version