वाट बघण्यालाही मर्यादा असतात, शिंदे गटाचा ठाकरेंना अप्रत्यक्ष अल्टिमेटम

वाट बघण्यालाही मर्यादा असतात, शिंदे गटाचा ठाकरेंना अप्रत्यक्ष अल्टिमेटम

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांच्यात दिलजमाई होऊन ते एकत्र येतील, असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र पुढाकार कोण घेणार यावर घोडे अडले होते. त्यावरूनच आता ‘वाट बघण्याला मर्यादा असतात,’ असे सांगत शिंदे गटाने आज, शुक्रवारी निर्वाणीचा इशारा दिला आहे.

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेत ‘उठाव’ झाल्याने खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हायला लागले आहे. हीच गोष्ट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या समर्थक नेते व शिवसैनिकांच्या जिव्हारी लागली आहे. भाजपाच्या मदतीने शिंदे गटाने सरकार स्थापन केले आहे. पण त्याचबरोबर शिंदे गटातील बहुतांश आमदारांनी सामोपचाराची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात समेट होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुखपदी नरेश म्हस्के यांची पुनर्नियुक्ती

याच संदर्भात शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांना आज प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, खूप वेळ झाला की, परिस्थिती बिघडते. वेळ जर असाच निघून गेला तर, महाराष्ट्रात जे काही घडेल ते थांबवण्याची क्षमता माझी तसेच अन्य कोणाचीही नाही. त्यामुळे वेळ कोणी घालवू नये. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र आले पाहिजे, अशी भूमिका मी शिंदे गटाचा प्रवक्ता म्हणून सातत्याने मांडली आहे. याला प्रतिसाद मिळाला किंवा मिळाला नाही, तर त्यात माझा दोष नाही.

राजकारणात सतत पुढे चालत जायला लागते. कारण राजकारण हे जनतेसाठी असते, महाराष्ट्रासाठी असते. राजकारण हे कुठल्या व्यक्ती अगर पक्षासाठी नसते. त्यामुळे कोण किती काळ वाट बघत राहणार? याला सुद्धा मर्यादा असतात, असे सांगून केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना एक प्रकारे अल्टिमेटमच दिला आहे.

हेही वाचा – आजपासून देशात मोफत बुस्टर डोस देण्यास सुरुवात, सर्व प्रौढांना 75 दिवसांत मिळणार लस

First Published on: July 15, 2022 1:32 PM
Exit mobile version