वेदांत- फॉक्सकॉन गुजरातला गेल्याने आदित्य ठाकरे आक्रमक; आज तळेगावात ‘जनआक्रोश आंदोलन’

वेदांत- फॉक्सकॉन गुजरातला गेल्याने आदित्य ठाकरे आक्रमक; आज तळेगावात ‘जनआक्रोश आंदोलन’

मुंबई : वेदांत- फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली जात आहे. हा प्रकल्प गुजरातला गेल्याने 1 लाख मराठी बेरोजगार तरुणांचा रोजगार हिरावून घेतला आहे. शिंदे – फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि केंद्र सरकारच्या दबावामुळे हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप करत विरोधकांनी राज्यभरात आक्रमक भूमिका घेतली. तसेच सामान्य नागरिकांमध्येही हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान वेदांता गुजरातला गेल्याच्याविरोधात शिवसेना नेते, युवासेने प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या तळेगावात आज (शनिवार) 24 सप्टेंबर रोजी जन आक्रोश आंदोलन करणार आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाने यासंदर्भात निवेदन जारी केले आहे. या अनुषंगाने तळेगावात 1.54 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रकल्प न उभारल्याच्या विरोधात ‘जन आक्रोश आंदोलन’ करण्यात येत आहे.

दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण त्यांच्या तीन दिवसीय दौऱ्यावर गुरुवारी पुण्यात आल्या होत्या, त्यांनी वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट महाराष्ट्रातून गुजरातला हलवल्याबद्दल उद्धव आणि आदित्य ठाकरेंसह विरोधकांवर सडकून टीका केली. विरोधक मगरीचे अश्रू ढाळत असल्याचा आरोप त्यांनी केला. आपल्या सत्ताकाळात पाच मोठ्या प्रकल्पांच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचे काम विरोधक करत असल्याचे ते म्हणाले. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंकडून वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प राज्यातील खोके सरकारच्या नाकर्तेपणामुळे गुजरातला गेल्याता आरोप केला जात आहे. त्याविरुद्ध राज्यभरात आता संताप व्यक्त होत आहे. यासाठीच आज शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने एल्गार पुकारण्यात आला आहे.

वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प पुण्यातील ज्या भागात होणार आहे, त्या वडगाव मावळ पंचायत समिती कार्यालयासमोर शनिवारी सायंकाळी 4 वाजता हे जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्राला 1.54 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि एक लाख नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकार बेरोजगार तरुणांना रोजगार कसा देणार, असा सवाल आंदोलनाच्या माध्यमातून केला जाणार आहे. प्रस्तावित प्रकल्प गुजरातला नेण्याच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलन करण्यात येणार आहे.


रिफायनरी कोकणातचं होणार! पेट्रोलियम मंत्र्यांची राजापूरच्या ‘या’ गावांना पसंती

First Published on: September 24, 2022 8:52 AM
Exit mobile version