शिवसेनेचे उद्या जोरदार शक्तिप्रदर्शन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजप, मनसे आणि राणांचा समाचार घेणार

शिवसेनेचे उद्या जोरदार शक्तिप्रदर्शन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजप, मनसे आणि राणांचा समाचार घेणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भोंग्यावरून तापवलेले राजकीय वातावरण, राणा दाम्पत्याने हनुमान चालिसावरून दिलेले आव्हान आणि भाजप नेत्यांकडून होणारे राजकीय हल्ले या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शनिवारच्या सभेसाठी शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे. कोरोना प्रादुर्भावानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथनच खुल्या मैदानात शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. या निमित्ताने राजकीय परिस्थितीवर बोलताना भाजप, मनसे आणि राणा दाम्पत्याचा आपल्या शैलीत समाचार घेणार आहेत.

‘एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकूया १४ मे च्या सभेत मी मास्क काढून बोलणार’, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांच्या भाषणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. बीकेसीतील एमएमआरडीएच्या मैदानावर आयोजित सभेत ठाकरे हे संध्याकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. मुंबई महापालिकेसह राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने शिवसेनेची उद्याची सभा महत्वाची आहे.

शिवसेना नेते अनिल परब यांच्याकडे या सभेच्या आयोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. एमएमआरडीए मैदानात दीड लाख लोक बसू शकतात, एवढी क्षमता आहे. शिवाय शिवसेनेने मुंबई शहर आणि परिसरातील शिवसैनिकांना या सभेला येण्याचे आवाहन केले आहे.

मशिदींवरील भोंगे उतरवण्यावरून राज्य सरकारला अल्टीमेटम देत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात गेले महिनाभर तणावाचे वातावरण निर्माण केले. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांना कोंडीत पकड्याची एकही संधी सोडली नाही. भोंगे, हनुमान चालिसावरुन शिवसेनेच्या हिंदुत्वाला राज ठाकरे यांनी दिलेले आव्हान, त्यातच चारच दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांच्या सुरू असलेल्या कारवायांवरून राज ठाकरेंनी ‘सत्ता येत – जात असते. कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उध्दव ठाकरे तुम्हीही नाही’ अशा शब्दात मुख्यमंत्र्यांना फटकारले होते. याचा समाचार उध्दव ठाकरे थेटपणे घेण्याची शक्यता आहे.

याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १ मे च्या सभेत उध्दव ठाकरे आणि शिवसेनेला उद्देशून ‘तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही’ असे बोलून शिवसेनेला डिवचले आहे. त्यामुळे फडणवीस यांचाही ते समाचार घेणार असल्याची शक्यता आहे. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती अपक्ष आमदार रवी राणा यांनी शिवसेनेच्या विरोधात उघडलेली राजकीय मोहीम आणि या दरम्यान केलेली अश्लाघ्य टीका याचाही समाचार उद्धव ठाकरे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


हेही वाचा – स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकडांऐवजी ‘ब्रिकेट्स बायोमास’चा होणार वापर

First Published on: May 13, 2022 8:47 PM
Exit mobile version