शिवसेनेचा द्रौपदी मुर्मूंनाच पाठिंबा, उद्धव ठाकरेंनी जाहीर केली भूमिका

शिवसेनेचा द्रौपदी मुर्मूंनाच पाठिंबा, उद्धव ठाकरेंनी जाहीर केली भूमिका

सध्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची जय्यद तयारी सुरू आहे. एनडीएकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर, विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना नक्की कोणाला पाठिंबा देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. त्यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. शिवसेना द्रौपदी मुर्मू यांनाच पाठिंबा देणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. (Shivsena supports Droupadi Murmu in president election)

हेही वाचा – शिंदे सरकारला कोणतेही अधिकार देऊ नयेत, शिवसेनेची राज्यपालांकडे पत्राद्वारे मागणी

द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील महिला असून त्यांना देशाच्या सर्वोच्च स्थानावर बसण्याची संधी द्यावी, अशी मागणी अनेकांनी केली. त्यामुळे त्यांच्या मागणीचा विचार करता शिवसेना द्रौपर्दी मुर्मू यांनाच पाठिंबा देणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरे म्हणाले की, राष्ट्रपती पदासाठी कोणत्या उमेदवाराला संधी द्यायची यासंदर्भात चर्चा करण्यासाठी अनेकजण आले होते. शिवसेनेतील नेते, खासदार, आमदारकीसाठी उभे राहिलेले उमेदवार, आदिवासी समाजातील पदाधिकारी, शिवसैनिक यांनी प्रत्यक्ष भेटून द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. तसेच, शिवाजीराव ढवळे यांनीही विनंती केली होती. राज्यसभेसाठी उमेदवारी दिलेले आमषा पडवी, पालघर जिल्हा परिषदेतील निर्मला गावित यांनीही भेटून द्रौपदी मुर्मू यांनाच पाठिंबा दर्शवा अशी विनंती केली. तसेच, आदिवासीच नव्हे एसटी, एनटी समाजातील लोकांनीही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दर्शवला आहे. आमच्या समाजाला ओळख मिळेल. आमच्या समाजातील व्यक्ती सर्वोच्च पदावर बसल्यास आम्हाला आनंद होईल, असं या साऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांच्या प्रेमाच्या आग्रहाचा आदर करत शिवसेना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत आहे.

हेही वाचा – द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेचा पाठिंबा, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

ते पुढे म्हमाले की, आम्ही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत असलो तरीही यामागे कोणाचाही दबाव नाही. सध्या राजकारणात जे काही चाललं आहे त्यावरून आम्ही द्रौपदी मुर्मू यांना विरोध करायला हवा होता. पण शिवसेनेने कधीच राष्ट्रपती पदासाठी कोत्या मनाने विचार केला नाही. ज्यावेळी प्रतिभाताई यांचं नाव आलं तेव्हासुद्धा शिवसेनाप्रमुखांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन देशाचा विचार केला आणि प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता. प्रणव मुखर्जी यांनाही पाठिंबा दिला होता. योग्य व्यक्ती राष्ट्रपती पदी विराजमान होतेय म्हणून त्यांना पाठिंबा दर्शवला होता.

दरम्यान, भाजप आणि शिवसेना यांचे संबंध ताणले गेले असताना शिवसेनेच्या खासदारांनी ठाकरे यांच्यावर मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी दबाव आणला होता. मुर्मू या आदिवासी समाजाच्या महिला आहेत. मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांची तुलना करता मुर्मू यांनाच पाठिंबा देणे उचित ठरेल, असं स्पष्ट मत खासदारांनी व्यक्त केलं आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळीच स्पष्ट केलं होतं.

द्रौपदी मुर्मू यांचा राजकीय प्रवास – 

द्रौपदी मुर्मू ह्या 2015 मध्ये झारखंडच्या राज्यपाल बनल्या. त्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत. त्या 2000 ते 2004 पर्यंत ओडिशा विधानसभेत रायरंगपूरच्या आमदार होत्या आणि राज्य सरकारमध्ये मंत्री होत्या. भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दलाच्या युती सरकारमध्ये त्या 6 मार्च 2000 ते 6 ऑगस्ट 2002 पर्यंत स्वतंत्र प्रभारासह वाणिज्य आणि परिवहन राज्यमंत्री होत्या. तसेच  6 ऑगस्ट 2002 ते 16 मे 2004 पर्यंत त्यांनी मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री भुषवले.

 

First Published on: July 12, 2022 5:33 PM
Exit mobile version