उद्धव ठाकरेंच्या लाडामुळे श्रीकांत शिंदेंना कल्याणची जागा, संजय राऊतांचा खुलासा

उद्धव ठाकरेंच्या लाडामुळे श्रीकांत शिंदेंना कल्याणची जागा, संजय राऊतांचा खुलासा

उद्धव ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंचे फाजील लाड केले. संजय राऊतांचा खुलासा

राज्यात सध्या शिवसेना-भाजप युतीचे सरकार आहे. हे दोन चाकावर असलेल्या सरकारचा कारभार सध्या तरी नीट सुरु असल्याचेच दिसून येत आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या एका व्हिडीओमुळे राजकारणात आणि खासकरून शिंदे-फडणवीस यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. भाजपकडून कल्याण, डोंबिवली जागा लढण्याची तयारी करण्यात आलेली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या श्रीकांत शिंदेंनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सध्या तरी काहीच आलबेल नसल्याचेच दिसून येत आहे.

हेही वाचा – Shivsena एकनाथ शिंदेंनी नाही तर ‘या’ व्यक्तीने फोडली..; संजय राऊतांचा दावा

पण आता यासंदर्भात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्याकडून टीका करण्यात आली आहे. तर त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या फाजील लाडामुळे पक्षाच्या कार्यात कोणताच सहभाग नसणाऱ्या श्रीकांत शिंदेंना कल्याणची उमेदवारी देण्यात आली होती, असा खुलासा संजय राऊत यांनी केला आहे. तर आता मुख्यमंत्र्यांच्या पुत्रासमोर भाजपचं आव्हान म्हणून उभी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

त्यांनी नेहमीच बंडखोरी केली…

भाजप-शिवसेनेच्या 25 वर्षांच्या युतीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “आता त्यांचा-आमचा काही संबंध नाही. ते भाजपाशी आपलं गुलामीचं नातं निभावत आहेत. आमची २५ वर्षं त्यांच्याशी युती राहिली. नेहमीच भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेशी असा संघर्ष केला आगे. निवडणुकीतही उमेदवार पाडण्यासाठी ते आमच्याशी बंडखोरी करत होते. तरीही आम्ही हे नातं २५ वर्षं निभावलं. आता त्यांना निभावू द्या. आता त्यांना कळेल की शिवसेना कोणत्या संघर्षातून जात होती. आम्ही भाजपाशी नातं का तोडलं याचा अनुभव त्यांना घेऊ द्या.”

त्यांच्यासमोर आता भाजपचं आव्हान…

“आनंद दिघे व बाळासाहेब ठाकरे यांनी त्या वेळी कल्याण-डोंबिवलीची जागा शिवसेनेसाठी खेचून घेतली होती. तेव्हा तिथे राम कापसे भाजपासाठी निवडणूक लढायचे. पण शिवसेनेनं ती जागा घेतली आणि निरंतर तिथे उमेदवार निवडून आले. पण आता मुख्यमंत्र्यांचे पुत्रच तिथून खासदार आहेत. पण तरी भाजपानं त्यांच्यासमोर आव्हान निर्माण केलंय की तुम्हाला ती जागा मिळणार नाही. आता प्रत्येक जागेवर हाच प्रश्न निर्माण होणार आहे”, असे यावेळी संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले.

उद्धव ठाकरेंच्या फाजील लाडामुळे…

“अशा घडामोडींकडे आम्ही फार गांभीर्याने पाहातच नाही. हे होणारच होतं. आणखी होणार आहे. कल्याण-डोंबिवलीची जागा शिवसेनेशी, पक्षकार्याशी कोणताही संबंध नसताना श्रीकांत शिंदेंना देण्यात आली. त्यासाठी गोपाळ लांडगे यांना दिलेली उमेदवारी मागे घेण्यात आली होती. तेव्हा उद्धव ठाकरेंनी शिंदे पुत्राचे हे फाजील लाड केले होते. त्यांना दोनदा सीट दिली. ते दोनदा निवडून आले. आता त्यांना त्यांचा संघर्ष करू द्या. आता प्रत्येक जागेसाठी भाजपा यांना रडवल्याशिवाय राहणार नाही”, अशी टीका देखील यावेळी संजय राऊत यांनी शिंदे पिता-पुत्रावर केली.

First Published on: June 10, 2023 11:36 AM
Exit mobile version