सहावा मजला, सूट आणि खदखद!

सहावा मजला, सूट आणि खदखद!

१९९५ साली शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशींनी मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी नवा कोरा सूट शिवला होता. तेव्हा काही उद्योगपती आणि काही बड्या राजकीय नेत्यांनी स्व. प्रमोद महाजनांच्या मदतीने मुख्यमंत्रीपदाचा जोशींचा सूट उतरवला होता. आताही दिल्लीत उध्दव ठाकरेंसोबत एनडीएच्या बैठकीला जाऊन आल्यावर उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी पश्चिम उपनगरातील एका डिझायनरकडे सूट शिवून घेतला; पण त्याचवेळी एकनाथ शिंदे या दुसर्‍या नेत्याचा सूटही ठाण्याच्या वॉर्डरोबमध्येच राहिलाय. एकनाथ शिंदे यांनी छेडलेल्या या मूक आंदोलनामागे असलेला नायक कोण याचीच चर्चा सध्या युतीत सुरू आहे. सुभाष देसाईसह भाजपचे आशिष शेलार, डॉ अनिल बोंडे आणि काळे आडनावाच्या आमदारानेही वांद्य्राला सूट बनवयाला दिल्याचे खात्रीलायकरित्या समजते.

१९९९ साली निवडणुका सहा महिने अगोदर घेऊन शिवसेनेने मुख्यमंत्रीपद गमावल्यावर गेली वीस वर्षे मंत्रालयाचा सहावा मजला शिवसेनेला वारंवार खुणावतोय. पण कधी सत्ता नाही तर कधी आमदार कमी. आता सगळे मनासारखे होईल असे वाटत असतानाच आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्रीपद देण्याची तयारी आणि इच्छा असूनही शिवसेनेने नव्याने आलेली संधी गमावली.

शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आणि आपसातील कुरघाडीमुळे १०० दिवसांसाठी असलेले उपमुख्यमंत्रीपद धूसर झाले. येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल या महत्त्वाकांक्षेला लागलेला हा पहिला सुरूंग आहे. आधीच शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांचा अपवाद वगळता कॅबिनेट मंत्री असलेल्या सगळ्या मंत्र्यांना मतदारांनी २०१४ सालीच नाकारले आहे. तरीही महत्त्वाचे काहीही देताना सगळ्यात आधी सुभाष देसाई यांना देण्याच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुत्राने घात केला. विधानसभेतील आमदारांच्या देसाईंच्या हालचाली लक्षात येताच आमदारांनी मातोश्रीवर मूक शक्तिप्रदर्शन केले. आमदारांनी त्यासाठी ‘कमीत कमी शब्दांचा वापर’ हेच शक्तीस्थान असणार्‍या ठाण्याच्या एकनाथ शिंदे यांची निवड केली आणि मुहूर्त साधला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचा.

शब्दांच्या सामर्थ्यावर संघटना चालवणार्‍या पक्षनेतृत्वाला या अबोल निषेधाची खोली कळली आणि ७७ वर्षीय देसाईंना ‘थांबा’ सांगण्यात आलं. त्यामुळे ‘पहले हम’ करण्याच्या गडबडीत शिवसैनिकाला कामानिमित्त सहाव्या मजल्यावर जायची संधी मात्र तूर्तास गमवावी लागली आहे. ‘आम्ही तीन महिन्यांसाठी उपमुख्यमंत्री म्हणून एक योग्य नाव देऊ शकलो नाही.आता प्रश्न पडलाय मतदार आम्हाला खरंच मुख्यमंत्री निवडण्याची संधी देईल का? अशी ग्रामीण भागातील आमदाराची प्रतिक्रिया बोलकी आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दोन्हीकडे खूपच नाराजी आहे. मुख्यमंत्री फारसे खूश नसताना आशिष शेलार यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी दिल्लीतून दबाव येत आहे. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांनी राजीनामा देण्यासाठी निरोप देणारा फोन चंद्रकांत पाटलांनी शुक्रवारी केला होता. पण मी राजीनामा देणार नाही, हवे तर तुम्ही मला वगळा, असे मेहतांनी ठणकावून दादा पाटिल यांना सांगितल्यावर पाटील यांची भंबेरी उडाल्याची चर्चा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बंगल्यावर शुक्रवारी रात्री चवीनं सुरू होती. त्यामुळे आगामी काळात मेहता यांना हात न लावता त्यांचं महत्त्व खूपच कमी करण्यात येईल असेे दिसते.

याआधी भाजपने दुसर्‍या पक्षातील आयातांना आमदरकीची तिकिटे वाटल्यामुळे भाजपतील निष्ठावंत कार्यकर्ते खूपच नाराज आहेत. शिवसेनेच्या बाजूनेही जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रीपद देतानाच विधानपरिषद सदस्य तानाजी सावंत यांना मंत्रीपदाच्या बोहल्यावर चढवण्याबाबत पक्षातूनच नाराजी आहे. शिवसेनेतील एक पॉवरफूल पदाधिकारी सावंत यांच्या मंत्रीमंडळ समावेशासाठी आग्रही आहे. शिवसेनेच्या आमदारांमध्ये सध्या देसाई समर्थक आणि शिंदे समर्थक असे दोन गट पडले आहेत. सेनेत मात्र याला ‘जिते हुए’ आणि ‘हारे हुए’ असे टोपन नाव दिले आहे.

मातोश्रीवरील आमदारांच्या शक्तिप्रदर्शनाच्या वेळी एकनाथ शिंदेंनी ठरवून आमदार केलेले रवींद्र फाटक छुप्या देसाई श्रध्देमुळे अनुपस्थित होते. फाटकांना अधिक जबाबदारीची पदं मिळवून देण्यासाठी गेल्या काही काळात उद्योगमंत्री देसाईंनी आपलं वजन वापरल्याचं शिवसेनेच्या विश्वसनीय सूत्रांकडून समजते. फाटकांच्या अनुपस्थितीवरून अनेक तर्कवितर्क लढवले जात असून ठाण्यामध्येच शिंदेच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी अजून दोन विधानसभेतील आमदार एकत्र आल्याचे कळते.

शिवसेनेच्या काही पदाधिकारी, माजी आमदार आणि उपनेत्यांची वर्णी महामंडळांच्या जागांवर नुकतील करण्यात आली आहे. पण लोकसभेच्या निकालानंतरही त्यांना नेमणुका पत्रं मिळालेली नाहीत. ही सगळी जबाबदारी सुभाष देसाई यांच्यावर शिवसेनेने सोपविली आहे. पण त्यांच्याकडून नीट पाठपुरावा होत नसल्याने पक्षीय पातळीवरही देसाईंबाबत नाराजी आहे. दुसरीकडे भाजपने नेमलेल्या पदाधिकार्‍यांनी मुंबई पोर्ट ट्रस्टपासून एमएमआरडीए पर्यंतच्या पदाधिकार्‍यांनी कार्यभार स्वीकारला आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर सेनेतली धुसफूस कमी झाली नाही आणि विशेषत्वाने देसाईंवरचं प्रेम मातोश्रीला मर्यादित ठेवता आलं नाही तर मात्र भाजप वरचढ होऊन वांद्रेकरांच्या डोक्यावर बसू शकतो, अशी भीती सेनेत दबक्या आवाजात व्यक्त करण्यात येत आहे.

आशिष शेलार यांना जर मंत्रीपद मिळाले तर शिवसेनेला नवी डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे येणारा काळ हा मुख्यमंत्र्यांइतकाच किंबहुना त्यापेक्षा जास्त उद्धव ठाकरेंची सत्त्वपरीक्षा पाहणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

First Published on: June 16, 2019 5:24 AM
Exit mobile version