… म्हणून अंधेरी पूर्वची जागा भाजपाने सोडली होती, रोहित पवारांनी केला गौप्यस्फोट

… म्हणून अंधेरी पूर्वची जागा भाजपाने सोडली होती, रोहित पवारांनी केला गौप्यस्फोट

rohit pawar

पुणे – कसबा पेठ आणि चिंचवडची येथील विधानसभेच्या जागा रिक्त असल्याने पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे येथे पोटनिवडणुका लागल्या आहेत. या पोटनिवडणुका बिनविरोध होण्यासाठी भाजपाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच महाविकास आघाडीने पोटनिवडणूक लढवण्याचं निश्चित केलं आहे. त्यांनी उमेदवारही जाहीर केले आहेत. परंतु, भाजपाकडून आता अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा दाखला देत महाविकास आघाडीने उमेदवार मागे घ्यावेत अशी मागणी करण्यात येत आहे. यावर, राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट केला आहे.

हेही वाचा – धक्कादायक! चिंचवडमधून भाजपाने दोघांना उमेदवारी दिली, पण नेमकं कारण काय?

आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्वची जागा रिकामी झाली होती. या ठिकाणी रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु, ऋतुजा लटके यांना भाजपाकडून जाणीवपूर्वक त्रास देण्यात आला असा आरोप रोहित पवारांनी केला. “ऋतुजा लटके यांना कोर्टात जावं लागलं, त्यांच्यावर विविध आरोप झाले, त्यांचं नाव खराब करण्याचा प्रयत्न झाला. भाजपाच्या सर्व्हेनुसार त्यांची पिछेहाट होताना दिसली, म्हणून अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून त्यांनी माघार घेतली,” असं रोहित पवार म्हणाले.

“उमेदवारावर नाराजी नाही. आमची भाजपावर नाराजी आहे. त्यामुळे त्यांना तिथेही धक्का बसण्याची शक्यता आहे. लक्ष्मण जगतापांना अजित दादांनी त्यांना खूप मदत केली. आजारपणातही अजित पवारांनी मदत केली. भाजपाने तेव्हा त्यांना दवाखान्यातून बाहेर काढून मतदानासाठी नेण्याचं काम केलं. व्यक्ती आजारी असताना कोणतीही मदत भाजपाकडून झाली नाही. याबाबत त्यांचे कुटुंबच सांगतील. त्यामुळे तिथे असणारी लोकं भाजपासोबत राहतील असं वाटत नाही,” असंही रोहित पवार म्हणाले.

चिंचवडमध्ये उमेदवारीवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत धुसफूस सुरू होती. परंतु रविवारी सायंकाळी शिवसेना प्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यातील चर्चेनंतर चिंचवडच्या जागेवर राष्ट्रवादी निवडणूक लढवणार असल्याचं घोषित करण्यात आलं. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कलाटे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आश्विनी जगताप विरुद्ध राहुल कलाटे असा सामना आता पाहायला मिळणार आहे.

First Published on: February 6, 2023 3:43 PM
Exit mobile version