घंटागाड्यांनी सोलापूर शहर होणार कचरामुक्त

घंटागाड्यांनी सोलापूर शहर होणार कचरामुक्त

घंटागाडी

घरोघरी जाऊन कचरा उचलणार
शहरासह हद्दवाढ भागातील कचरा गोळा करण्यासाठी सोलापूर महापालिकेच्या १६५ घंटागाड्या आजपासून विविध प्रभागांत धावायला सुरुवात झाली आहे. महिनाअखेर कंटेनरमुक्त सोलापूर होईल, असा विश्वास महापालिका आयुक्त त्र्यंबक ढेंगळे -पाटील यांनी व्यक्त केला होता. या निमित्ताने स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर आणि स्मार्ट सोलापूर ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरण्यास सुरुवात झाली.
प्रत्येक प्रभागात सहा ते सात घंटागाड्या आठ तास फिरून कचरा गोळा करतील. हा कचरा शहरातील चार ठिकाणी मोठ्या गाड्यांत एकत्र करून तो तुळजापूर रोड येथील कचरा डेपोकडे पाठवण्यात येईल, असेही ढेंगळे-पाटील यांनी सांगितले.
दररोज किमान तिनशेटन कचरा गोळा झाला पाहिजे, अशी अपेक्षा आहे. प्रत्येक घंटागाडीला मार्ग ठरवून दिला आहे. आठ तास या घंटागाड्या ठरवून दिलेल्या मार्गावर फिरून घरोघरीचा कचरा गोळा करतील, या गाड्यांमध्ये ओला आणि सुका कचरा असे दोन स्वतंत्र भाग केले आहेत. लोकांनी दारासमोर घंटागाडी आली की ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करून घंटागाडीमध्ये टाकावा. शहर स्वच्छतेच्या या उपक्रमासाठी स्मार्ट सिटी योजनेतून एकशेवीस घंटागाड्या मिळाल्या असून नागरिकांना कचऱ्यांचे वर्गीकरण करण्यासाठी प्लास्टिकचे डबे दिले जाणार आहेत, असेही ढेंगळे-पाटील यांनी सांगितले.
स्मार्ट सिटीच्या ए,बी,डी एरियात महापालिकेने प्रायोगिक तत्वावर शून्य कचरा मोहीम राबविली. त्याच धर्तीवर आता संपूर्ण शहरात आणि हद्दवाढ भागात शून्य कचरा मोहीम राबवली. इतरही भागांत राबवण्यात येणार आहे. महिनाअखेर सर्व घंटागाड्या घरोघरी जाऊन कचरा गोळा करतील.त्यामुळे विविध ठिकाणी ठेवलेले कंटेनर टप्याटप्याने काढण्यात येतील. कंटेनरमुक्त सोलापूर असे चित्र पाहायला मिळेल.

First Published on: May 23, 2018 12:53 PM
Exit mobile version