उघड्यावर लघुशंका केली; उठा-बशांची शिक्षा मिळाली

उघड्यावर लघुशंका केली; उठा-बशांची शिक्षा मिळाली

प्रातिनिधिक फोटो

उघड्यावर थुंकणे किंवा लघुशंका करणे या गोष्टी जवळपास सगळीकडेच चालतात. मात्र, अशाप्रकारे चुकीचं वर्तन करणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाते का? आणि ती कारवाई खरंच सक्तीची असते का हे महत्वाचं असतं. काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी रस्त्यावर थुकंणाऱ्यांसाठी एक अजब कारवाई लागू केली आहे. पुण्यात एखादा माणूस रस्त्यात थुंकताना दिसल्यास दंड भरण्यासोबतच त्याला घाणही साफ करावी लागेल, असा नियम पुणे पोलिसांनी जाहीर केला आहे. मात्र, आता सोलापूरमध्येही उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांना अशीच एक अजब शिक्षा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही शिक्षा दुसऱ्या-तिसऱ्या कुणी सुनावली नसून, खुद्द सोलापूर महापालिका आयुक्तांनी केली आहे. पालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांनी गणपती घाट येथे उघड्यावर दोघेजण लघुशंका करत असलेल्यांना चक्क उठा-बशा काढण्याची शिक्षा दिली.

सविस्तर प्रकरण…

आयुक्त अविनाश ढाकणे हे नेहमीप्रमाणे पहाटे वॉकिंग करायला गेले होते. त्यावेळी गणपती घाट येथील मृत्यू पश्चात केल्या जाणाऱ्या विधीच्या ठिकाणी दोनजण लघुशंका करत होते. त्या दोघांवर आयुक्तांची नजर पडताच त्यांनी त्या दोघांना झापले. येथे फक्त पुरुषच नसून महिलासुध्दा वॉकिंगला येतात. आपल्याच घरच्या महिलांसमोर आपण अशा चुका करतो का? मग सार्वजनिक ठिकाणी का? येथे सुध्दा कोणाच्या तरी आई-बहिणी आहेत, असे सांगून आयुक्तांनी त्यांना उठा-बशा करायला लावले. वॉकिंग करणाऱ्या इतरांनी सुध्दा याचा बोध घेतला.

खास पुणेरी शिक्षा

पुणे पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर थुकंणाऱ्यांसाठी एक अजब कारवाई लागू केली आहे. ही शिक्षा म्हणजे जे लोक थुंकताना दिसतील त्यांना तिथल्या तिथे कपडा आणि पाणी देऊन त्यांची थुंकी साफ करावी लागते आहे. त्यामुळे आता पुण्यात थुंकणं लोकांना चांगलंच महागात पडणार असं दिसतंय. ‘पुण्यात थुंकण्यापूर्वी आता हजारवेळा विचार करा’ अशी प्रतिक्रियाही काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. यापूर्वी पुण्यात रस्त्यावर थुंकणाऱ्यांना १०० रुपयांचा दंड आकारला जात जायचा. मात्र, आता त्यासोबतच थुंकणाऱ्याला त्याचीच थुंकी स्वच्छ करण्याची शिक्षाही दिली जात आहे.

 

First Published on: November 23, 2018 7:43 PM
Exit mobile version