सोनई हत्याकांडप्रकरणी पाच आरोपींची फाशी कायम

सोनई हत्याकांडप्रकरणी पाच आरोपींची फाशी कायम

अहमदनगर जिल्ह्यातील सोनई हत्याकांडप्रकरणी मुंबई हायकोर्टाने सहापैकी पाच आरोपींची फाशी कायम ठेवली आहे. एका आरोपीचा खटल्याच्या सुनावणीदरम्यान मृत्यू झाला आहे. १ जानेवारी २०१३ मध्ये घडलेल्या संपूर्ण राज्याला हादरवणार्‍या या ऑनर किलिंगप्रकरणात नाशिक कोर्टाने सहाही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यापैकी पाचजणांची फाशी मुंबई हायकोर्टाने कायम ठेवली तर एका आरोपीची पुराव्याअभावी सुटका करण्याचा निर्णय दिला आहे.

नगर जिल्ह्यातील सोनई इथे 1 जानेवारी 2013 रोजी प्रेमप्रकरणातून तिघांचे हत्याकांड झाले होते. ऑनर किलिंगच्या या प्रकाराने संपूर्ण राज्य हादरले होते. नाशिक सत्र न्यायालयाने २०१८ मध्ये या हत्याकांडाचा निकाल दिला. आरोपी प्रकाश विश्वनाथ दरंदळे, रमेश विश्वनाथ दरंदळे, पोपट विश्वनाथ दरंदळे, गणेश पोपट दरंदळे, संदीप कुर्‍हे आणि अशोक नवगरे यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. जातीवाद आणि त्यातून होणार्‍या अशा घटना म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे. या आरोपींना दया दाखवणे म्हणजे शहरी वस्तीत लांडगे सोडण्यासारखे आहे.

हा प्रकार दुर्मिळातील दुर्मिळ आणि ऑनर किलिंगचा असल्याचे नाशिक सत्र न्यायालयाने म्हटले होते. या निकालाच्याविरोधात आरोपींनी मुंबई हायकोर्टात दाद मागितली होती. हा खटला सुरू असताना पोपट विश्वनाथ दरंदळे याचा तुरुंगात असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या खटल्याची सुनावणी नुकतीच पूर्ण झाली होती. त्यानंतर सोमवारी मुंबई हायकोर्टाने त्याबाबत निकाल देताना आरोपी प्रकाश दरंदळे, रमेश दरंदळे, गणेश दरंदळे, संदीप कुर्‍हे यांची फाशी कायम ठेवली. तर अशोक नवगरे याची पुराव्याअभावी सुटका करण्याचा आदेश दिला आहे.

गेल्यावर्षी जानेवारी 2018 मध्ये नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सोनई हत्याकांडप्रकरणी सहा आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. दरम्यानच्या काळात एका आरोपीचा कोठडीतच मृत्यू झाला. रविवारी कोर्टाने उर्वरित मृत आरोपीसकट पाचजणांची फाशी कायम ठेवली.

काय आहे प्रकरण?

अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील सोनई गावात २०१३मध्ये तिहेरी हत्याकांड घडलं होतं. संदीप राज थनवार (वय २४), राहुल कंडारे (वय २६) आणि सचिन घारू (वय २३) या तिघांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. गवत कापायच्या विळ्याने या तिघांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले होते. सोनईच्या गणेशवाडी शिवारातील मुलगी नेवासा फाट्यावरील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलमध्ये बीएडचे शिक्षण घेत होती. संस्थेत सफाई कामगार म्हणून काम करणार्‍या मेहतर समाजातील सचिन सोहनलाल घारू आणि तिच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. याबाबत तिच्या कुटुंबाला समजल्यानंतर प्रेमप्रकरणाने गंभीर वळण घेतले.

रमेश विश्वनाथ दरंदळे, पोपट विश्वनाथ दरंदळे (चुलते), प्रकाश विश्वनाथ दरंदळे (चुलते), गणेश ऊर्फ प्रवीण पोपट दरंदळे (भाऊ), संदीप माधव कुर्‍हे (मावसभाऊ), त्यांचा नातेवाईक अशोक रोहिदास फलके आणि अशोक सुधाकर नवगरे यांनी दरंदळे वस्तीवरील संडासचे सेफ्टी टँक दुरुस्तीचा बहाणा करून व वाजवीपेक्षा जास्त मजुरीचे आमिष दाखवून संदीप राजू थनवार, सचिन सोहनलाल घारू व तिलक राजू कंडारे यांना १ जानेवारी २०१३ रोजी बोलावून घेतले. यावेळी संशयितांनी संदीप थनवार यास सेफ्टी टँकच्या पाण्यामध्ये बुडवून ठार केले. त्यानंतर पळून जाणार्‍या राहुल कंडारे याचा कोयत्याने, तर सचिन घारूचा वैरण कापण्याच्या अडकित्त्यामध्ये अडकवून खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता.

First Published on: December 3, 2019 6:45 AM
Exit mobile version