बोर्डाचे आदेश पण, ‘या’मुळे दहावी-बारावीचे निकाल रखडणार

बोर्डाचे आदेश पण, ‘या’मुळे दहावी-बारावीचे निकाल रखडणार

shree ekveera vidyalaya results online

करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे शाळा, कॉलेज ३१ मार्चपर्यंत बंद केल्याने शिक्षकांसमोर दहावी, बारावीचे पेपर कसे तपासायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. याचा परिणाम निकाल विलंबाने लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने पेपर घरी तपासायला देण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला. मात्र, संचारबंदी असताना हे पेपर घरी कसे न्यायचा असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे.

पेपर तपासायला घरी नेण्याचे बोर्डाचे आदेश

राज्यभरातून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत. तर १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. दरम्यान, बारावीची परीक्षा झाली आहे तर दहावीचा केवळ सामाजिक शास्त्र भाग-२ (भूगोल) या विषयाचा पेपर करोनामुळे पुढे ढकलला आहे. दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका मूल्यांकन आणि नियमन करण्यासाठी पूर्वी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांच्या नावाने उत्तरपत्रिकांचे पार्सल पाठविण्यात येत होते. हे काम परीक्षक आणि नियामक म्हणून नेमणूक केलेले शिक्षक घरी करत असत. या पद्धतीमध्ये गोपनीयता राखली जात नव्हती. दरम्यान, गैरप्रकार होण्याची शक्यता विचारात घेता राज्य मंडळाने कॅप सेंटरवरच पेपर तपासणी गेल्या काही वर्षांपासून सुरु केली आहे.

राज्यात करोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढत असल्याने सरकाने खबरदारीचा उपाय म्हणून माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि ज्युनियर कॉलेजातील शिक्षकांना सुट्टी दिली आहे. त्यातच राज्यामध्ये संचारबंदी लागू करत रेल्वे, एसटी, बस बंद केल्याने शाळेमध्ये जाऊन उत्तरपत्रिकांचे परीक्षण आणि नियमन कसे करायचा असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे. परीक्षांचे निकाल वेळेत लागणे आवश्यक असल्याने परीक्षेच्या उत्तरपत्रिका अटीचे बंधन घालत माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेजातील शिक्षकांना पेपर तपासण्यासाठी घरी देण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय सोमवारी राज्य मंडळाने घेतला आहे. याला शिक्षकांनी जोरदार विरोध केला आहे. संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परीक्षक नियामकांकडे जाऊ शकत नाही. अशा वेळेस पेपर तपासणीचे काम करणार कसे हे सध्या तरी कठीण आहे, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे.

प्रवास बंदी आहे. घराबाहेर पडणे शक्य नाही. रेल्वे सेवा बंद आहे. बहुतांश शिक्षक गावी गेले आहेत. मुंबईतील शिक्षक ठाणे जिल्हा, पालघर, रायगड जिल्ह्यातील विरारा, पनवेल, अंबरनाथ, कल्याण येथून आता पेपर नेण्यासाठी शाळेत कसे येणार हा निर्णय आताच्या घडीला योग्य नाही.  – शिवनाथ दराडे, मुंबई कार्यवाह, राज्य शिक्षक परिषद

शिक्षकांना मंडळाने घातलेल्या अटी

१. उत्तरपत्रिका परिक्षण व नियमानासाठी शिक्षकांना त्यांच्या घरुन तपासण्यास केवळ या परीक्षेपूर्ती अनुमती देण्यात येत आहे.
२ उत्तरपत्रिका मोजून व सुस्थितीत असल्याची खातरजमा करुन शिक्षकांनी मुख्याध्यापकांकडून व कनिष्ठ
महाविद्यालयाच्या संबंधित प्रमुखांकडून ताब्यात घ्याव्यात.
३. उत्तरपत्रिकांचे परिक्षण व नियमन घरातून करताना त्याची पूर्णतः गोपनीयता व सुरक्षिता राखली जाईल याची शिक्षकांनी दक्षता घ्यावी.
४. उत्तरपत्रिकांचे परीक्षण किंवा नियमन वेळेत पूर्ण करून त्या विहित पध्दतीने गोपनीयता व सुरक्षितता विचारात घेऊन त्या केंद्रातच हस्तांतरीत कराव्यात.
५. आपल्याकडील उत्तरपत्रिका खराब होणार नाही अथवा गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.


हेही वाचा – धक्कादायक! ‘करोना’ पाठोपाठ चीनमध्ये नवा ‘हंता’ व्हायरस; एकाचा मृत्यू


 

First Published on: March 24, 2020 7:56 PM
Exit mobile version