लॉकडाऊन कुठे कडक,शिथिल करायचे ते राज्यांनी ठरवावे

लॉकडाऊन कुठे कडक,शिथिल करायचे ते राज्यांनी ठरवावे

- पंतप्रधानांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सूचना

करोना दीर्घ काळासाठी आपल्यात राहणार आहे हे समजून आपली धोरणे ठरवा, लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते राज्यांनी विचार करून ठरवायचे आहे. ‘दो गज दूरी’ हा आपला जीवनाचा मंत्र बनवा आणि आत्मसात करा. मास्क, फेसकव्हर हे देखील आपल्या जीवनात खूप काळासाठी राहणार आहेत हे लक्षात घ्या. लॉकडाऊनही राहील आणि जीवनही सुरळीत सुरू असेल, असे समतोल ठेवणारे धोरण बनवा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सोमवारी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत करोना विषयावर ही चौथी व्हिडिओ कॉन्फरन्स होती. आधीच्या कॉन्फरन्समध्ये काही राज्यांना बोलण्याची संधी मिळाली. जी राज्ये राहिली होती त्यांच्या मुख्यमंत्र्यांना करोनाविषयक त्यांच्या राज्यात काय काय उपाययोजना सुरू आहेत ते सांगण्याची संधी मिळाली. महाराष्ट्राने यापूर्वीच्या तीन कॉन्फरन्समध्ये आपल्या उपाययोजनांची माहिती दिली होती.

एका बाजूला आपल्याला करोनाचा मुकाबला करायचा आहे तर दुसरीकडे आर्थिक व्यवहार गतीने सुरू करायचे आहे. करोना साथीला सुरुवात झाली आणि चीन वगळता इतर जे २० देश यात भारताबरोबर होते, त्या देशांमध्ये आजघडीला ७ ते ८ आठवड्यांनी भारताच्या तुलनेत १०० पट जास्त लोकसंख्या संक्रमित झाली आहे. कितीतरी मोठ्या संख्येने लोक मृत्यूमुखी पडले आहेत. आपण योग्य वेळी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. राज्यांनी पण याची चांगली अंमलबजावणी केली, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या देशात अनेक लोक, विद्यार्थी, यात्रेकरू ठिकठिकाणी अडकले आहेत, त्यांना आणावयाचे आहे. विदेशातून अनेक भारतीयांना आणायचे आहे, त्यांना लगेच चाचण्या करून क्वॉरंटाईन करायचे आहे. हे लक्षात घेऊन लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते राज्यांनी विचार करून ठरवायचे आहे, असेही ते म्हणाले.

आर्थिक व्यवहार सुरू करायचेत
एका बाजूला आपल्याला करोनाचा मुकाबला करायचा आहे तर दुसरीकडे आर्थिक व्यवहार गतीने सुरू करायचे आहे. ३ मे रोजी दुसरा लॉकडाऊन संपण्याची तारीख असली तरी विशेषत: रेड आणि ऑरेंज झोन मध्ये अतिशय काळजी घेण्याची गरज आहे. येणार्‍या दिवसांत ग्रीन झोन मॉडेल्स बनवा. जीवन पद्धती, आपले कामकाज त्यानुरूप बनवण्याची गरज आहे. ज्या क्षेत्रांमध्ये करोनाचा जास्त प्रादुर्भाव आहे तिथे अर्थातच आर्थिक नुकसानही जास्त होणार. २० एप्रिलनंतर आपण काही ठिकाणी शिथिलता आणली; पण त्यामुळे आपले आव्हानही वाढले आहे. नक्की कुठले प्रश्न वाढले आहेत त्याचा अभ्यास करा, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले.

First Published on: April 28, 2020 7:18 AM
Exit mobile version