‘संजय राऊतांनी मुलाखतीतून उद्धव ठाकरेंवरच उगवला सूड!’, तरूण भारतची टीका

‘संजय राऊतांनी मुलाखतीतून उद्धव ठाकरेंवरच उगवला सूड!’, तरूण भारतची टीका

मुख्यमंत्र्यांच्या सभेतून राज्यातील गढूळपणा दूर होईल, संजय राऊतांचा विरोधकांवर निशाणा

राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, ती त्यातल्या माहितीमुळे नसून त्यात संजय राऊतांनी (Sanjay Raut) विचारलेले प्रश्न आणि उद्धव ठाकरेंनी दिलेल्या उत्तरांमुळे. सामनाच्या अग्रलेखातून वेळोवेळी भाजपवर तोंडसुख घेणाऱ्या संजय राऊत यांच्या या मुलाखतीवर आता तरूण भारतमधून शेलक्या शब्दांमध्ये टीका करण्यात आली आहे. ‘मुख्यमंत्र्यांची मुलाखत खळबळजनक असेल, अशी जाहिरात होती. पण ती लोकांना खदखदून हसवणारी निघाली. त्यात संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंच्या डॉक्टरी ज्ञान आणि वैद्यकीय ज्ञानासंदर्भात प्रश्न विचारून उद्धव ठाकरेंचा सूड तर घेतला नाही ना, असंच वाटत आहे. आपल्या भावाला मंत्रिपद न मिळाल्याचा राग अजूनही राऊतांच्या मनात शांत झालाच नसणार. ज्या प्रश्नामुळे मुख्यमंत्र्यांची सर्वत्र छी थू होत आहे, असा प्रश्न राऊतांनी विचारणं याला दुसरं कुठलं समर्पक कारण सापडत नाही’, अशा शब्दांत तरुण भारतमधून या मुलाखतीवर (Interview) टीका करण्यात आली आहे.

राऊतांचा ‘तो’ प्रश्न सोशल मीडियावर व्हायरल!

या मुलाखतीमध्ये संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) विचारलं होतं, ‘आपलं ऐकताना मला सारखं वाटायचं की जागतिक आरोग्य संघटनेलासुद्धा राज्याचे मुख्यंमत्रीच मार्गदर्शन करत आहेत. इतकं आपलं डॉक्टरी ज्ञान, वैद्यकीय ज्ञान आपल्या बोलण्यातून दिसत होतं. हे ज्ञान आपल्याकडे आलं कुठून?’ त्यावर ‘याला नेमकं असं काही उत्तर नाही’, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली होती. त्याची तरुण भारतच्या ‘अहो रूपमहो ध्वनि:’ या शीर्षकाखाली छापून आलेल्या प्रासंगिकामध्ये खिल्ली उडवण्यात आली आहे. ‘मुख्यमंत्र्यांच्या राजकीय परिपक्वतेची सध्या उडवली जाणारी खिल्ली पुसून काढण्यासाठी ही मुलाखत केल्याची दाट शक्यता आहे. पण झालं उलटंच. मुलाखतीची प्रसिद्धी टिंगलटवाळीची झाली. अस्सल शिवसैनिकांनी तर घरात आपापली डोकी भिंतीवर आपटून घेतली असतील’, असं यात म्हटलं आहे.

..याचे मुख्यमंत्र्यांनाही काही वाटले नाही?

दरम्यान, या प्रासंगिकामध्ये संजय राऊतांवर देखील निशाणा साधण्यात आला आहे. ‘ठाकरे कुटुंबीयांच्या कृपेनं संपादक आणि खासदार झालेली व्यक्ती कुटुंबप्रमुखाची मुलाखत घेईल, तेव्हा ते स्तोत्रच असेल, हे स्वाभाविक आहे. पण ती स्तोत्राच्याही पुढे जाऊन लाळघोटेपणाचा नवा नीचांक प्रस्थापित करणारी ठरली आहे. आणि या प्रश्नांची उत्तरं देताना मुख्यमंत्र्यांना देखील कसं काहीच वाटलं नाही, हे आणखी एक आश्चर्य आहे. असं करत असताना एक क्षण देखील पिताश्री बाळासाहेब ठाकरेंचं (Balasaheb Thackeray) स्मरण झालं नसेल का?’, असा थेट सवालच मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला आहे.

‘कंबरेंच सोडलं नि डोक्याला गुंडाळलं’!

या प्रासंगिकात, उद्धव ठाकरेंच्या घरातून बाहेर न पडण्यावर देखील तोंडसुख घेण्यात आलं आहे. ‘उद्धव ठाकरेंच्या घरातच बसून राहण्यावर टीका होत आहे. त्यावर ठाकरे म्हणतात की मी घरात बसून संपूर्ण राज्य फिरत असतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करायचा नाही तर शोध कशाला लावायचे? आता यावर हसायचं की रडायचं? ही व्यक्ती जवळच्या मंत्रालयात देखील जात नाही. ज्या कडव्या हिंदुत्वासाठी शिवसेना ओळखली जायची, त्याबाबत तर त्यांनी कंबरेचं सोडलं अन् डोक्याला गुंडाळलं असं वर्तन केलं आहे’, असं यात म्हटलं आहे.

इथे वाचा पूर्ण प्रासंगिक : https://epaper.tarunbharat.net/article.php?mid=Mpage_2020-07-28_df755ad94c018dd712695ace75889387

First Published on: July 28, 2020 1:37 PM
Exit mobile version