उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना दोनदा फोन, भाजप श्रेष्ठींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न, शिवसेनेचा इन्कार

उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना दोनदा फोन, भाजप श्रेष्ठींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न, शिवसेनेचा इन्कार

मुंबईः उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा केल्याची माहिती समोर आली होती, मात्र केंद्रीय नेतृत्वाने उद्धव ठाकरेंच्या फोनवर येण्यास नकार दिला होता. भाजप शिवसेना नेतृत्वाशी चर्चा करणार नाही. उद्धव ठाकरेंशी बोलायचंच असेल तर बंडखोर गटाशी बोला, असं हायकमांडचं म्हणणं असल्याच्याही बातम्या चालवल्या होत्या.

परंतु त्यासंदर्भात आता शिवसेनेकडून खुलासा करण्यात आला आहे. सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला, अशा बातम्या प्रकाशित होत आहेत. या निव्वळ भूलथापा आहेत. उद्धव ठाकरे जे बोलायचे ते खुलेआम बोलतात, कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये आणि पसरवू नये, असंही शिवसेना जनसंपर्कप्रमुख हर्षल प्रधान म्हणालेत.

दुसरीकडे महाराष्ट्रात सरकारचा फॉर्म्युला ठरला असल्याचंही सांगितलं जात आहे. भाजप शिंदे यांच्यासह सर्व पक्षांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देणार आहे. सहा आमदारांवर एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद दिले जाणार आहे. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे कॅम्पमध्ये 6 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्री दिले जाऊ शकतात. सुरुवातीला 4 मंत्रिपदे रिक्त ठेवण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्रिपदासह मोठे मंत्रिपद दिले जाईल. तर भाजपकडे 18 कॅबिनेट मंत्री आणि सुमारे 10 राज्यमंत्री केले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

21 जून आणि त्यानंतरही उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना फोन केल्याच्या बातम्या माध्यमांवर प्रसारीत झाल्या होत्या. परंतु शिवसेनेनं ते वृत्त खोटं असल्याचं सांगितलं आहे. शिवसेनेचं सरकार वाचवण्यासाठी फोन केल्याचं सांगितलं जात होतं. शिवसेनेत शिंदे गट अशी फूट न पडता एकत्रित भाजपसोबत सत्ता स्थापन करता येते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकनाथ शिंदे गटाला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर फ्लोअर टेस्टबाबत राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव सरकारविरोधात कधीही अविश्वास प्रस्ताव येऊ शकतो. त्याचवेळी शिंदे गटाच्या पाठिंब्याशिवायही भाजप सरकार स्थापनेचा दावा करू शकते. यात विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपालांनी भूमिका निर्णायक ठरू शकते. परंतु भाजपकडून यावर अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया दिली जात नाहीये.


हेही वाचाः उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना दोनदा फोन, भाजप हायकमांडशी संपर्क साधण्याचा प्रयत्न

First Published on: June 28, 2022 2:28 PM
Exit mobile version