नामांतराबाबत उद्या कॅबिनेट घेऊन निर्णय घेणार – एकनाथ शिंदे

नामांतराबाबत उद्या कॅबिनेट घेऊन निर्णय घेणार – एकनाथ शिंदे

महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आले तेव्हा त्यांनी तातडीने मंत्रिमंडळ बैठक बोलावून २००-३०० निर्णय घेतले. मात्र, ही बैठक अनधिकृत होती. सरकार अल्पमतात असताना कॅबिनेट घेऊ शकत नाही. त्यावेळी आम्ही बुहमतासाठी राज्यपालांना पत्रही लिहिलं होतं. त्यामुळे या कॅबिनेटमध्ये घेतलेले निर्णय बेकायदेशीर आहेत. उद्या मंत्रिमंडळ बैठक घेऊन आम्ही काही निर्णय घेणार आहोत. निर्णयांवर शिक्कामोर्तब करणार आहोत. औरंगाबाद, उस्मानाबाद यांचे नामांतराच्या निर्णयावर उद्या शिक्कामोर्तब करू, असं एकनाथ शिंदे म्हणाले. ते आज अब्दुल सत्तारांनी मुंबईच्या रविंद्र नाट्य मंदिरात आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बोलत होते. (The cabinet will take a decision on the name change tomorrow – Eknath Shinde)

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठक घेऊन औरंगाबादचे नामकरण करून संभाजीनगर करण्यात आले होते. तसेच, उस्मानाबादचे नाव बदलून धाराशीव करण्यात आले होते. तर, नवी मुंबईच्या विमानतळाला दि.बा. पाटील यांच्या नावालाही हिरवा कंदील देण्यात आला होता. याचप्रमाणे तब्बल ३०० जीआर काढण्यात आले होते. मात्र, हे जीआर अनधिकृत असून उद्या याबाबत बैठक घेऊन या निर्णयांवर शिक्कामोर्तब करणार आहोत.

ते पुढे म्हणाले की, औरंगाबादचं नाव संभाजीनगर करणारच आहोत. कारण, संभाजीनगर हे नाव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुखातून आलेलं नाव आहे.

जगाने घेतली नोंद

५० लोक जेव्हा एकीकडे सत्ता असते, एकीकडे मोठे नेते असतात, सरकार असतं, यंत्रणा असते. आणि सत्तेमध्ये आपण असताना सत्ता सोडून ज्याच्याकडे काहीच नाही अशा एकनाथ शिंदेच्या विश्वासावर सोबत करतात ही छोटी गोष्ट नाही. या घटनेची नोंद राज्यातील नाही, देशातील नाही जगाने घेतली. टीव्ही लावला की एकनाथ शिंदे आणि आमचे ५० आमदार हेच दाखवत होते. शहाजी बाजू यांनी तर गुवाहाटीचा प्रचार करून टाकला. काही लोकांनी खूप कला दाखवल्या. एकीकडे म्हणत होते जबरदस्ती करून पळवून नेले. ५० जणांना पळवून नेता येईल का? असाही प्रश्न एकनाथ शिंदे यांनी यावेळी विचारला.

तुमचं राजकीय करिअर अबाधित राहील

तुम्ही ५० लोक आहात. मला माझी काळजी नाही, माझ्या राजकीय जीवनाची काळजी नाही. पण मला तुम्हा ५० लोकांची काळजी आहे. मला जेव्हा वाटेल मी तुमचं नुकसान करतोय तेव्हा मी माझी सर्व जबाबदारी एकट्यावर घेईन, तुमचं राजकीय करिअर अबाधित ठेवण्याची तयारी एकनाथ शिंदेची आहे.

लोकशाहीत आकड्याला किंमत

आम्ही संयम बाळगत होतो, आमच्याशी चर्चा करायला पाठवत होते, पदावरून काढत होते. पण आमच्याकडे बहुमत होतं. लोकशाहीत बहुमताला, आकड्याला किंमत असते. लोकशाहीत नियम आहे. दगडफेक करा म्हणणारेच पाठी राहिले. एकनाथ शिंदे असा हलका आहे की काय असंही एकनाथ शिंदे.

आमदारांना आलेले अनुभव वाईट

अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार सत्ता स्थापन झालं तेव्हा अनेकजण सांगत होते घात होतोय, वाट बदला. मी तेव्हा सर्वांना सांगितलं प्रमुखांचा आदेश मानन्याची आपली परंपरा आहे. सुरुवातीला मला सांगितलं होतं की मुख्यमंत्रीपद मिळणार. पण मला मिळालं नाही, मी ते डोक्यातून काढूनही टाकलं. पण आमदारांना आलेले अनुभव वाईट होते. पडलेल्या उमेदवाराला भरपूर निधी देणं सुरू झालं. श्रीकांत देशपांडे आघाडीत राहून पराभूत झाला. राज्यसभेचे उमेदवार निवडून येतील एवढी मते आपल्याकडे होती. पण तरीही पराभव झाला. आघाडीत राहून राज्यसभेत पराभव होतो. ते का पडले याचं आत्मपरिक्षण करायची गरज होती.

…तर शिवसेनेचं दुकान बंद होईल

आम्ही लपून छपून काम केलं नाही. आमच्या कामात पारदर्शकता होती. बरेच प्रयत्न झाले. अडवा अडवीचे प्रयत्न झाले. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक. छातीचा कोट करून लढणारे शिवसैनिक आहोत. बंडखोरी, गद्दार अशा आम्हाला उपमा दिल्या. वाट्टेल ते बोलू लागले. बाळासाहेबांची शिकवण होती अन्यायाविरोधात उठा, लढा. अडीच वर्षे अन्याय सहन केला. म्हणूनच आम्ही उठाव केला. काँग्रेस-राष्ट्रवादी आमचे शत्रू. त्यांना जवळ करू नका, असं बाळासाहेब म्हणायचे. अशी ज्यावेळी वेळ येईल, तेव्हा शिवसेनेचं दुकान बंद करेन, असंही बाळासाहेब म्हणाले होते, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

 

First Published on: July 15, 2022 4:23 PM
Exit mobile version