जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री; अजित पवार यांच्या सासुरवाडीत झळकले बॅनर

जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री; अजित पवार यांच्या सासुरवाडीत झळकले बॅनर

धाराशिव : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्रीपदावर आत्ताच क्लेम करायला तयार असल्याचे मोठे विधान केले होते. त्याच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असतानाच अजित पवार यांच्या सासुरवाडीमध्ये भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागल्याने जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (Ajit Pawar’s mother-in-law’s banner reads ‘Future Chief Minister’)

सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर राज्य सरकारमधील १६ आमदार अपात्र ठरणार, शिंदे-फडणवीस सरकार पडणार, राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपासोबत जाणार, महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार असा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. मात्र अजित पवार यांनी मी जीवातजीव असेपर्यंत राष्ट्रवादीसोबतच राहणार असल्याचे सांगत या चर्चांना पुर्णविराम दिला होता. असे असताना अजित पवार यांची सासुरवाडी धाराशिव जिल्ह्यातील ‘तेर’मध्ये अजित पवार मुख्यमंत्री होणार असे बॅनर लागले आहेत. तेर गावात ठिकठिकाणी “तेरचे जावई, आमचे नेते जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजित पवार,” अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. याशिवाय अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्यांच्या सासुरवाडीच्या लोकांनी आज सकाळी संत गोरोबा काकांच्या मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली. त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होणार या चर्चांनी जोर धरला आहे.

हेही वाचा – पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून विरोध असेल तर… अजित पवारांचं मोठं वक्तव्य

यापूर्वी भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स लागले
विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपात जाणार आणि महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप होईल अशा चर्चा मागील काही दिवसांपूर्वी सुरू होत्या. त्यानंतर त्यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ‘मी जिवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीत राहणार’ असल्याचे स्पष्ट केले होते. या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्रीपदावर आत्ताच क्लेम करायला तयार असल्याचे मोठे विधान केले होते. त्यानंतर पुण्यातील भाजपच्या बालेकिल्ल्यात म्हणजे कोथरुड परिसरात ‘जनतेच्या मनातला मुख्यमंत्री’ असा उल्लेख असणारे बॅनर्स झळकले होते. त्यानंतर आता पुन्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भावी मुख्यमंत्री आशयाचे बॅनर्स लागल्याने लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

First Published on: April 25, 2023 4:05 PM
Exit mobile version