…भविष्यात सर्वांसाठी नोकऱ्या नाहीत; अजब विधानानंतर सत्तारांची सारवासारव

…भविष्यात सर्वांसाठी नोकऱ्या नाहीत; अजब विधानानंतर सत्तारांची सारवासारव

राज्याचे पणन व अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी सिल्लोड सोयगांव मतदारसंघातून 25 हजार नागरिकांना नेण्याचं उद्धिष्ट ठेवलं आहे. त्यासाठी अब्दुल सत्तार यांनी तब्बल दोनशे बस बुक केल्या आहेत.

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार आपल्या वादग्रस्त विधानासाठी नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी आज (१५ मार्च) दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभामध्ये पुन्हा एकदा धक्कादायक विधान केले आणि नंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

अब्दुल सत्तार यांनी पदवी प्रदान समारंभात बोलताना वक्तव्य केले की, अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या पदव्या घेतल्या असल्या तरी भविष्यामध्ये सर्वांना नोकऱ्या मिळणार नाहीत, पण ज्यांना मिळणार, ते मी आत्ताच सांगितले तर सगळ्यांना हसू येईल. हे विधान केल्यानंतर सत्तारांच्या चूक लक्षात आली आणि त्यांनी सारवासारव करताना म्हटले की, राज्य सरकारकडून आता ज्या ७५ हजार नोकऱ्या मिळणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला आणि भविष्यातील विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे, असे म्हणत त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

शेतकऱ्यांविरुद्धही वादग्रस्त वक्तव्य
काही दिवसांपुर्वीच अब्दुल सत्तार यांनी शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही. अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करत आहेत, असे वादग्रस्त विधान केले होते. या विधानानंतर सत्तार यांच्या अडचणीत वाढल्या होत्या.

सुप्रिया सुळेवर गलिच्छ भाषेत टीका
शिवसेनेतून बंड करून बाहेर पडल्यानंतर मविआ सरकारमधील नेत्यांनी ४० आमदारांवर पन्नास खोके एकदम खोके अशी टीका केली होती. यावेळी सुप्रिया सुळे यांनीसुद्धा अब्दुल सत्तारांवर टीका करताना
50 खोके मिळाले का, असा प्रश्न केला होता, या प्रश्नाला उत्तर देताना सत्तारांनी तुम्हालाही द्यायचे का? असा प्रतिप्रश्न केला. सत्तारांच्या या प्रश्नाला प्रत्युत्तर देत सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, तुम्हाला 50 खोके मिळाले असल्यानेच तुम्ही मला ऑफर करत असल्याची पुन्हा टीका केली होती. या टीकेवर मात्र सत्तार भडकले आणि त्यांचे बोलण्यावरील नियंत्रण सुटले. त्यांनी सुप्रिया सुळेंना उत्तर देताना म्हटले की, सुप्रिया सुळे इतकी भिकार….झाली असेल तर त्यांनाही देऊ. या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच खवळल्याचे पाहायला मिळाले होते.

First Published on: March 15, 2023 4:02 PM
Exit mobile version