उद्योजक हुंडेकरी अपहरण प्रकरणातील मुख्य आरेपीला बेड्या

उद्योजक हुंडेकरी अपहरण प्रकरणातील मुख्य आरेपीला बेड्या

प्रातिनिधिक छायाचित्र

अहमदनगरमधील उद्योजक करीम हुंडेकरी यांच्या अपहरण प्रकरणातील मुख्य मास्टरमाइंड असलेल्या गुन्हेगाराला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी अजहर शेख याला पोलिसांनी मध्यप्रदेशातून अटक केली. नोव्हेंबरमध्ये नगरमधील उद्योजक करीम हुंडेकरी यांचे 25 लाख रुपयांच्या खंडणीसाठी चार जणांनी शस्त्राचा धाक दाखवून अपहरण केले होते.

पोलीस मागावर असल्याने अपहरणकर्त्यांनी हुंडेकरी यांना जालन्यात सोडून दिले होते. याप्रकरणी पोलिसांनी निहाल उर्फ बाबा मुशरफ शेख (परतुर, जिल्हा जालना) याला एका अल्पवयीन साथीदारांसह त्यावेळी अटक केली होती. तर या गुन्ह्यातील मास्टरमाइंड असलेल्या मुख्य आरोपीच्या शोधात पोलीस होते. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी घटनेपासून फरार होता. मास्टरमाइंड असलेला अजहर शेख मध्यप्रदेशमधील शिवनी येथे असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने मध्यप्रदेशात जाऊन शेखच्या मुसक्या आवळल्या. जवळपास चार महिने पोलिसांना गुंगारा देणारा शेख हा सराईत गुन्हेगार आहे.


हेही वाचा – धक्कादायक: महाराष्ट्रात २६ टक्के बालविवाह तर ८ टक्के किशोरवयीन गर्भधारणा


हुंडेकरी यांच्या अपहरणानंतर पोलिसांनी शेख याचा कसोशीने तपास केला, मात्र शेख याच्याबद्दल निश्चित माहिती मिळत नव्हती. स्थानिक गुन्हे शाखा आणि तोफखाना पोलीस त्याच्या मागावर होते. शेख मध्यप्रदेशमधील शिवनी येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस पथकाने शिवनी येथील आरोपी रहात असलेले गाव हे पेंच अभयारण्य परिसरात असल्याने आरोपी हा दिवसभर अभयारण्यामध्ये आपले अस्तित्व लपवून रात्री खवासा या गावामध्ये येत असल्याची माहीती मिळाल्याने पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी वेषांतर करुन आरोपी रात्रीच्या वेळी मुक्कामी रहात असलेल्या घराची पाहणी करत सापळा लावला. आरोपी अझहर शेख हा दोन दिवसांपासून घरी आला नाही, मात्र पोलिसांनी शेख याला मोठया शिताफीने पकडून नगरला आणले.

 

First Published on: March 14, 2020 6:56 PM
Exit mobile version