जेवण ‘पार्सल’साठी स्टील डब्याचा वापर करावा लागणार, हॉटेल चालकांना पालिकेचे निर्देश!

जेवण ‘पार्सल’साठी स्टील डब्याचा वापर करावा लागणार, हॉटेल चालकांना पालिकेचे निर्देश!

मुंबई : मुंबईला प्रदूषणकारी व हानिकारक प्लास्टिकपासून मुक्ती देण्यासाठी मुंबई महापालिका आता काही कडक उपाययोजना करीत आहे. त्याच अनुषंगाने पालिकेने मुंबईत प्लास्टिकचा जास्त वापर करणाऱ्या हॉटेल व्यवसायिकांकडे आपला मोर्चा वळवला आहे. यापुढे हॉटेलमधून जेवण व अन्य खाद्यपदार्थ पार्सल करून नेण्यासाठी पुनर्वापर करता येणाऱ्या डब्यांचा अथवा स्टील डब्यांचा वापर करावा लागणार आहे. तसे निर्देश पालिकेकडून हॉटेल व्यवसायिकांना देण्यात येणार आहेत.

पुढील आठवड्यात मुंबई महापालिका प्रशासकीय अधिकारी व हॉटेल व्यवसायिक, आहार संघटनेची बैठक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उपआयुक्त संजोग कबरे यांनी ही माहिती दिली. मुंबई महापालिकेने पर्यावरणाला हानिकारक प्लास्टिकवर 2018मध्ये बंदी घातली होती. तेव्हापासून पालिकेने हानिकारक प्लास्टिकची निर्मिती व विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. हानिकारक प्लास्टिक वापरल्याबद्दल अनेक व्यापारी, दुकानदार यांच्यावर जप्तीची व दंडात्मक कारवाई पालिकेने केली आहे.

मात्र मार्च 2020पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पालिकेने मुंबईत टाळेबंदी लागू केली होती. त्यामुळे दुकाने, हॉटेल्स बंद ठेवण्यात आले. त्यांना काही बंधने घालण्यात आली होती. त्यामुळे पालिकेची प्लास्टिकविरोधी कारवाई थंडावली होती. मात्र आता सर्व सुरळीत सुरू झाल्याने पालिकेने पुन्हा एकदा प्लास्टिक बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.

या कारवाईचा व उपाययोजनेचा भाग म्हणून पलिकेने आता मुंबईतील हॉटेलमधून जेवण, नाश्ता, खाद्यपदार्थ पार्सल करून नेण्यासाठी एकवेळ वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक पिशव्या, कंटेनर यांच्या वापरावर बंदी आणून पुनर्वापर करता येणाऱ्या डब्यांचा अथवा स्टील डब्यांचा वापर करण्याबाबत काहीशी सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे निर्देश पालिकेकडून हॉटेल व्यवसायिकांना देण्यात येणार आहेत.

प्लास्टिक कोटेड वस्तूंवर बंदी
राज्यात प्लास्टिक कोटेड उत्पादनांवर बंदी घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने अलीकडेच घेतला आहे. प्लास्टिकच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लास्टिक बंदी नियमांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
शिवाय, केंद्र सरकारने 1 जुलै 2022पासून सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घातली असून राज्यात या बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. त्यामुळे सिंगल युज प्लास्टिक बंदी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

First Published on: August 17, 2022 11:09 PM
Exit mobile version