…तर हक्कभंग आणावा, कांदा प्रश्नावरून सभागृहात गोंधळ झाल्यानंतर फडणवीसांचे आव्हान

…तर हक्कभंग आणावा, कांदा प्रश्नावरून सभागृहात गोंधळ झाल्यानंतर फडणवीसांचे आव्हान

 Maharashtra Assembly Budget 2023-24 | मुंबई – कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यांच्या मालाला हमीभाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. यावरून, आज सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला. विधिमंडळात कामकाज सुरू होण्याआधी विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन केले तर, पहिल्याच सत्रांत विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांद्याची खरेदी नाफेडने सुरू केली आहे, तुमच्याकडे वेगळी माहिती असेल तर त्यांनी हक्कभंग आणावा, असं थेट आव्हानच त्यांनी विरोधकांना केलं आहे.

कांदा, तूर, हरभरासह अनेक शेतपीकांचे शेतकरी संकटात सापडले आहे. कांदा उत्पादक शेतकरी तर रडकुंडीला आला आहे. त्यामुळे कांदा निर्यातीवरील बंदी उठवावी, नाफेडमार्फत खरेदी सुरू करावी, अमरावतीत ज्या शेतकऱ्यावर लाठीचार्ज झाला त्याविरोधात कारवाई व्हावी अशा विविध मागण्यांसाठी विरोधकांनी सभागृह दणाणून सोडला.

यावर उत्तर देताना नाफेडने खरेदी सुरू केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. नाफेडकडून अद्यापही खरेदी सुरू झाली नसल्याचं सभागृहात विरोधकांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं उत्तर ऐकून घेण्यास विरोधकांनी नकार दिला. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या उत्तरात सहभाग घेत विरोधकांना थेट आव्हान केलं. ते म्हणाले की,  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढायचा आहे की राजकारण करायचं आहे हे ठरवलं पाहिजे. कांद्याची खरेदी नाफेडने सुरू केली आहे. तुमच्याकडे वेगळी माहिती असेल तर तुम्ही हक्कभंग आणावा, असं देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं.

पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं उत्तर देण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की, “कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी नाही. तसंच, नाफेडमार्फत खरेदी सुरू झाली आहे. आतापर्यंत २.३८ लाख मेट्रिक टन खरेदी झाली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार उभे राहिल. हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल.”

हेही वाचा – कांदा निर्यातीचे ट्विटर वॉर; सुप्रिया सुळे, पीयूष गोयल यांच्यात जुंपली

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कांदा निर्यातीवरून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात ट्विटर वॉर रंगले होते. कांदा निर्यातीवरील बंदी उठवावी, अशी मागणी खासदार सुळे यांनी केली होते. तर अशाप्रकारे कोणतीही बंद नसल्याचा खुलासा केंद्रीय मंत्री गोयल यांनी केला होता.

First Published on: February 28, 2023 11:34 AM
Exit mobile version