मुंबई मेट्रो स्थानकात सुरक्षारक्षक नाही; अपघातातील जखमी तरुणी घेणार कोर्टात धाव

मुंबई मेट्रो स्थानकात सुरक्षारक्षक नाही; अपघातातील जखमी तरुणी घेणार कोर्टात धाव

gauri sahu

मुंबईः 21 ऑक्टोबर 2022ला अंधेरीतील मरोळ स्थानकात मेट्रोच्या दरवाजात ड्रेस अडकल्याने गंभीर जखमी तरुणी आता कोर्टात धाव घेणार आहे. वाकोला येथील तरुणीने कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे निर्देश देण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतलाय. अपघातात गंभीर जखमी झालेल्या 20 वर्षीय गौरी साहू या तरुणीनं आधी अंधेरी पोलिसांशी संपर्क साधला होता, परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला, असा दावा दुखापतग्रस्त साहू हिने केलाय. मेट्रो प्राधिकरणाने तरुणीला धमकीही दिल्याचं तिचं म्हणणं आहे. आमच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यास तिच्या उपचारांचे वैद्यकीय बिल देणार नसल्याचंही मेट्रो प्रशासनानं सांगितल्याचा दावाही तिने केलाय.

मरोळ येथील एका शैक्षणिक संस्थेत क्लार्क म्हणून काम करणारी साहू ही मेट्रोची नियमित प्रवासी आहे. 21 ऑक्टोबरला संध्याकाळी ती कामावरून घरी परतत असताना गर्दी असल्याने तिला मेट्रोमध्ये चढता आले नाही. मात्र, तिचा ड्रेस मेट्रोच्या दरवाजात अडकला. जसजशी मेट्रो पुढे जाऊ लागली, तसतशी ती दरवाजाबरोबर प्लॅटफॉर्मवरून फरफटत गेली आणि रेलिंगवर आदळली. तिच्या यकृत, जबडा आणि हाताला मोठ्या जखमा झाल्या. तसेच तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांना 7 ते 8 तासांची शस्त्रक्रिया करावी लागली.

जेव्हा तिला मेट्रोच्या दरवाजात ओढले गेले, तेव्हा तिने मदत मागितली, परंतु कोणीही तिला मदतीला आले नाही. त्यावेळी प्लॅटफॉर्मवर एकही सुरक्षारक्षक उपस्थित नव्हता, असा दावाही तिने केलाय. साहू हिने मिड-डेला सांगितले, “माझे कपडे दरवाजात अडकल्यानंतर मी प्लॅटफॉर्मवर फरफटत गेले आणि रेलिंगवर आदळले. मला मदत करण्यासाठी तेथे कोणीही गार्ड नव्हता. माझा मित्र जो मेट्रोमध्ये प्रवेश मिळवण्यात यशस्वी ठरला होता तो पुढच्या स्टेशनवरून परत घेण्यासाठी आला आणि मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तो पुढच्या स्टेशनवरून परत येईपर्यंत कोणीही मला मदत केली नसल्याचंही साहू हिने सांगितलं.

माझीही चूक होती हे मला माहीत आहे, पण मदतीसाठी प्लॅटफॉर्मवर गार्ड असायला हवे होते. त्यामुळे मेट्रो प्रशासनाविरोधात मला गुन्हा दाखल करायचा आहे,” असंही ती म्हणाली. जेव्हा मी रुग्णालयात होते, तेव्हा मेट्रोचे कर्मचारी मला भेटायला आले, मला आणि माझ्या कुटुंबाला पोलीस तक्रार करू नका, असे सांगितले. पोलीस तक्रार केल्यास त्यांनी सुमारे 10 लाख रुपयांचा वैद्यकीय खर्च न देण्याची धमकी दिली होती. माझ्या कुटुंबाला उपचार परवडत नसल्याचंही तिने सांगितले. “मी 23 दिवस हॉस्पिटलमध्ये होते. मला डिस्चार्ज मिळाल्यानंतर कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा नोंदवण्यासाठी मी अंधेरी पोलिसांकडे धाव घेतली. त्यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले, पण गुन्हा नोंदवला नाही. त्यामुळे आता मी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करणार आहे.

अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संताजी घोरपडे म्हणाले, “आम्ही गुन्हा दाखल केलेला नाही. आम्ही पीडित तरुणी आणि मेट्रो कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी ही चूक महिलेची असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, दरवाजा बंद करण्यापूर्वी तीन वेळा घोषणा केल्या जातात आणि नंतर दरवाजावरील पिवळा दिवा चमकतो. तिने याकडे दुर्लक्ष करून मेट्रोमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तिचा ड्रेस अडकला. यात कोणाची चूक आहे हे पाहण्यासाठी आम्ही प्रकरणाचा तपास करीत आहोत.”

साहू अनेकदा पोलिसांत गेली. पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज आहेत. प्लॅटफॉर्मवर कोणीही गार्ड उपस्थित नव्हता. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत मेट्रो प्राधिकरण निव्वळ दुर्लक्ष करीत आहे. आम्ही लवकरच एक रिट याचिका दाखल करू आणि एफआयआर नोंदवण्यासाठी अंधेरी मेट्रोपॉलिटन कोर्टात अर्जही दाखल करू. पोलीस गौरीला मदत करीत नाहीत. मेट्रो प्राधिकरणाने बिले भरली, पण त्यांनी साहूला योग्य ती भरपाई दिली नाही, असंही साहूचे वकील विनय कुमार खातू यांनी सांगितले. मेट्रोच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटले की, “पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत, त्यामुळे आम्ही त्यावर भाष्य करू शकत नाही.”


हेही वाचाः हजारो पदे भरणार, कोरोना भत्ता देणार; महाजनांच्या आश्वासनानंतर ‘मार्ड’चा संप मागे

First Published on: January 3, 2023 9:45 PM
Exit mobile version