अकरावी प्रवेशासाठी तिसरी विशेष फेरीही होणार, विद्यार्थ्यांना आजपासून भरता येणार अर्ज

अकरावी प्रवेशासाठी तिसरी विशेष फेरीही होणार, विद्यार्थ्यांना आजपासून भरता येणार अर्ज

मुंबई – अकरावी प्रवेशासाठी आतापर्यंत शून्य फेरी, ३ नियमित फेर्‍या आणि २ विशेष फेर्‍यांचे आयोजन शिक्षण संचालनालयामार्फत करण्यात आले आहे. दरम्यान, अद्यापही बहुतांश महाविद्यालयाचे कट ऑफ चढे राहिल्याने, पसंतीचे महाविद्यालय न मिळाल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत.

दरम्यान, यंदा प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य ही फेरी होणार नसल्याने विद्यार्थ्यांसाठी आणखी एका विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले असल्याचे माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यानी स्पष्ट केले. ही फेरी अकरावी प्रवेशाची शेवटची फेरी असणार असल्याचे ही त्यांनी वेळापत्रकात नमूद केले असून विद्यार्थ्यांना या फेरीमध्ये प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन केले आहे. या फेरीसाठी विद्यार्थ्यांना आजपासून अर्ज संपादित करता येणार असून याची गुणवत्ता यादी २३ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

शिक्षण संचालनालयाच्या सूचनांप्रमाणे पहिल्या विशेष फेरीनंतर बहुतांश महाविद्यालयांनी अकरावीचे नियमित वर्ग सुरू केले आहेत, मात्र पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेशाची वाट पाहणारा विद्यार्थ्यांचा गट तसेच कमी गुण असल्याने यादीत नाव न लागलेल्या विद्यार्थ्यांचा गट अद्यापही प्रवेशापासून वंचित आहे. या विद्यार्थ्यांसाठी संचालनालयाकडून तिसर्‍या विशेष फेरीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संचालक महेश पालकर यांनी दिली आहे. तिसर्‍या विशेष फेरीमध्ये विद्यार्थ्यांना १९ ते २० सप्टेंबर दरम्यान अर्ज भरण्यासह अर्जात दुरुस्ती, पसंतीक्रम नोंदवणे, अर्जाचा भाग दोन भरणे आदी प्रक्रिया करता येणार असून तिसर्‍या फेरीची निवड यादी २३ सप्टेंबरला जाहीर होईल. २३ आणि २४ सप्टेंबरदरम्यान प्रवेश निश्चित करणे, प्रवेश रद्द करणे आदी प्रक्रिया होणार आहे. २५ सप्टेंबरपर्यंत रिक्त जागांचा फेरी अखेर तपशील जाहीर करण्यात आला आहे.

First Published on: September 19, 2022 12:29 AM
Exit mobile version