पालघरमधील जि.प.शाळांचे स्ट्रक्चरल ऑडीट होणार

पालघरमधील जि.प.शाळांचे स्ट्रक्चरल ऑडीट होणार

पालघर जिल्हा परिषद

पालघर जिल्ह्यातील आठही तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. शिवाय अनधिकृत शाळांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी दिली.

जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांच्या इमारत जीर्ण झालेल्या असून मोडकळीस आलेल्या आहेत. अशा धोकादायक इमारतीत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आदिवासी बहुल क्षेत्र असलेल्या जव्हार, मोखाडा आणि तलासरी परिसरातील जिल्हा परिषदेच्या इमारती चितेंचे विषय बनल्या आहेत. याबाबत अनेक तक्रारी आहेत. जि.प.शाळांचा स्ट्रक्चरल ऑडीट करून आवश्यकतेनुसार दुरूस्ती, नूतनीकरणाचा प्रस्ताव तयार करून इमारतींचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यात 190 अनधिकृत शाळा आहेत. त्या शाळांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय जिल्हा परिषद शाळातील शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी सातारा जिल्ह्याच्या धर्तीवरील गुणवता सुधार कार्यक्रम पॅटर्न पालघर जिल्हयात राबविणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी शिंदेंनी सांगितले.

जिल्ह्यातील अनधिकृत शांळाच्या ठिकाणी शाळा अनधिकृत असल्याचे बोर्ड लावण्याचे आणि आवश्यक कारवाई करून त्या शाळा बंद करण्याचे आदेश वजा नोटीसा तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी 22 मे 2019 रोजी दिले होते. बोरिकर यांच्या या आदेशाला शिक्षण विभागाने गांभीर्याने घेतले नसल्याने अनधिकृत शाळा आजतागायत सुरू आहेत. अनेक शाळांमध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी, सुस्थितीतील शौचालय आणि आरोग्य बाबतच्या सगळया विषयाबाबत जिल्हाधिकारी कैलाश शिंदे यांनी कारवाई करणार असल्याचे सांगितले.

First Published on: August 1, 2019 4:07 AM
Exit mobile version