महाविकास आघाडी सरकारची ही शेवटची कॅबिनेट का? जयंत पाटील स्पष्टच म्हणाले..

महाविकास आघाडी सरकारची ही शेवटची कॅबिनेट का? जयंत पाटील स्पष्टच म्हणाले..

राज्यात एकीकडे एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे सत्तासंघर्ष सुरु असताना दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारची आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला अधिक महत्त्व आले होते. या बैठकीत आज तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यातील पहिला म्हणजे औरंगाबाद शरहाचं संभाजीनगर करण्यास मान्यता देण्यात आली. तर उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव करण्यात आले तर नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात मंजूरी देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आज मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. या संवादावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारची ही शेवटची कॅबिनेट बैठक होती का? या प्रश्नाचे थेट उत्तर दिले आहे.

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, दोन वेगवेगळ्या विचारसरणीच्या दोन पक्षांनासोबत घेऊन गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्र्यांनी चांगलेच सरकार चालवले. यावेळी सर्व सहकाऱ्यांना, सर्व मुख्य सचिवांपासून सर्वांना त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी मंत्रिमंडळात अनेक निर्णय झाले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही तीन शहरांची नावे दिली आहेत.

यावेळी माध्यमांनी जयंत पाटील यांना ही महाविकास आघाडी सरकारची शेवटची कॅबिनेट बैठक आहे का? असा प्रश्न विचारला, यावर जयंत पाटील म्हणाले की, उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विधीमंडळात बहुमताची चाचणी होईल की नाही हे समजेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच निश्चित होईल की, ही मंत्रिमंडळाची बैठक शेवटी बैठक होती की नाही ते…’. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आता महाविकास आघाडी सरकार कोसळणार की नाही हे निश्चित होणार आहे. जर महाविकास आघाडी सरकारला विधिमंडळात बहुमत सिद्ध करता आला नाही तर हे सरकार कोसळणार हे निश्चित आहे. त्यानंतर बंडखोर आमदार एकनाथ शिंदे गट भाजपसोबत सत्ता स्थापन करणार असल्याचे सत्ता गणित ठरत आहे.


‘माझ्याच लोकांनी दगा दिला’; मुख्यमंत्र्यांच हे विधान मन हेलावून टाकणारं-संजय राऊत

First Published on: June 29, 2022 8:44 PM
Exit mobile version