माझ्याच लोकांनी मला फसवलं, सहकार्याबद्दल धन्यवाद, मुख्यमंत्री भावूक

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेच्या 16 आमदारांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे, या परिस्थितीमुळे राजकीय परिस्थिती आणखी चिघळली आहे, एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे ठाकरे सरकारविरोधात आता बहुमत चाचणीची वेळ आली आहे. राज्यातील या सत्तासंघर्षात गेल्या दोन दिवसांपासून सलग महाविकास आघाडी सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडत आहे, आजही मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली, या बैठकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात पोहचले. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. तसेच मला माझ्याच लोकांनी फसवलं अशा शब्दात दु:ख व्यक्त केलं आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या मंत्र्यांच्या खात्याचे विषय राहिलेत ते आपण पुढच्या कॅबिनेटमध्ये घेऊयात. तुम्ही सर्वांनी जे सहकार्य दिले त्याबद्दल धन्यवाद. मला माझ्याच लोकांनी धोका दिल्याने आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. जी कायदेशीर प्रक्रिया तिला सामोरे जाऊया, मात्र मागील अडीच वर्षात तुम्ही सहकार्य केले, त्याबद्दल आभारी.. जर माझ्याकडून कोणाचा अपमान झाला असेल कोणी दुखावले गेले असतील तर मी माफी मागतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आता महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत गेल्या 24 तासांत राज्य मंत्रिमंडळाची दुसरी बैठक आज पार पडली. या बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घोषित करण्यात आले. यातील पहिला निर्णय म्हणजे औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यात आले. यानंतर दुसरा म्हणजे उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि तिसरा नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.


औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मंजूर, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय