हा ‘जागर’ नव्हे तर कांगावा, नीलम गोऱ्हे यांची आशिष शेलार यांच्यावर टीका

हा ‘जागर’ नव्हे तर कांगावा, नीलम गोऱ्हे यांची आशिष शेलार यांच्यावर टीका

मुंबई : सध्या आशिष शेलार यांचा सुरू असलेला ‘जागर’ हा जागर नसून कांगावा आहे. जोवर एखादी व्यक्ती शिवसेनेवर टीका करत नाही तोवर त्याला प्रमोशन मिळत नाही. शेलार टीका करत आहेत, पण त्यांना मंत्रिमंडळात घेतले जात नाही. फक्त मुंबईचे अध्यक्ष केले, अशी टीका विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी केली. मनसेची सध्याची अवस्था झोपी गेलेला जागा झाला अशी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. तरीही भाजप आमदार आशिष शेलार निराधार विधाने करत आहेत. काँग्रेससोबत आम्ही महाविकास आघाडीत असलो तरी आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार सोडले नाहीत. एखाद्या मुद्द्यावर मतभेद असणे आणि आघाडी म्हणून एकत्र राहणे, या दोन्हीही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, असे नील गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

रामाशिवाय हिंदुत्व नाही आणि हिंदुत्वाशिवाय शिवसेना नाही. सावरकर हे कट्टर हिंदुत्व समर्थक होते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना आणि नसताना देखील अयोध्येला जाऊन हिंदुत्वाचा पुरस्कार केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने आम्ही चाललो आहोत, असे त्या म्हणाल्या.

भारत जोडो यात्रेमध्ये ‘नफरत छोडो’ असा संदेश दिला जात असल्याने आदित्य ठाकरे त्या यात्रेत गेले. याचा अर्थ आम्ही राहुल गांधी यांच्या विधानाचे Hashtagsसमर्थन करतो, असे होत नाही. भारतीय जनता पक्ष मात्र स्वतः मेहबुबा मुफ्तीच्या बरोबर गेला आहे, असे निदर्शनास आणून स्वतः जे काम करत आहेत, ते त्यांना दिसत नाही का? असा सवालही गोऱ्हे यांनी केला.

श्रद्धा हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांना वकीलपत्र द्या
वसईच्या श्रद्धा वालकरच्या हत्या प्रकरणात मी लवकरच राज्याच्या गृहमंत्र्यांना भेटणार आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांना मदत व्हावी, या उद्देशाने विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी शिफारस आपण करणार असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले.

काय म्हणाले होते आशिष शेलार?
राहुल गांधी जाणूनबुजून सावरकरांचा अपमान करत आहे. एक मराठी माणूस ज्याने भारताच्या स्वातंत्र्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली पण झुकला नाही. त्या सावरकरांचा अपमान म्हणजे मराठी माणसाचा, देशाचा आणि राज्याचा अपमान काँग्रेस करत आहे आणि शिवसेना सत्तेत येण्यासाठी माती खात आहे आणि बोटचेपी भूमिका घेऊन केवळ इशारा देत आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली होती.

First Published on: November 18, 2022 8:26 PM
Exit mobile version