नदीमध्ये पोहण्यास गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू

नदीमध्ये पोहण्यास गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा नदीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना समोर आली आहे. रविवारी तिनही मुलं हे शिगणेवाडी गावातील मीना नदी पात्रात पोहण्यास गेले होते. तेव्हा, ते बुडाले. त्यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले होते. आज सकाळी तिघांचे मृतदेह आढळून आले असून घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रणव राजेंद्र वाव्हळ वय-१६, वैभव चिंतामण वाव्हळ वय-१५, श्रेयस सुधीर वाव्हळ वय-१५ अशी घटनेत मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.


पाण्याचा अंदाज न आल्याने नदीमध्ये बुडाले
वैभव, प्रणव आणि श्रेयस तिघेही दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होते. रविवार सुट्टी असल्याने मुले नदीत पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी गेली होती. मात्र, हा आनंद त्यांच्या जीवावर बेतला आहे. पोहण्यास गेलेल्या तिनही मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे. गोविंद वाव्हळ हे रविवारी साडेसहाच्या सुमारास नदी काठी फिरण्यासाठी गेले असता सायकल आणि कपडे नदी काठी दिसले यावरून मयत प्रणवचे चुलते महेंद्र यांना गोविंद यांनी फोन करून माहिती दिली. त्यानुसार त्यांनी घटनास्थळी येऊन तिघांचा शोध नदीमध्ये घेतला. मात्र, ते सापडले नाहीत, अखेर आज सकाळी एनडीआरएफच्या जवानांनी तिनही मुलांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
First Published on: September 30, 2019 2:09 PM
Exit mobile version