‘थितबी’च्या नवलाईत साहसी खेळांचा थरार

‘थितबी’च्या नवलाईत साहसी खेळांचा थरार

‘थितबी'ची नवलाई

माळशेज घाटाच्या पायथ्याशी वन विभागाच्या पुढाकाराने विकसीत करण्यात आलेल्या थितबी या पर्यटन गावात आता लवकरच साहसी खेळांची भर पडणार आहे. डोंगर चढाई, प्रस्तरारोहण, नदी ओलांडणे आणि  ट्रेकिंग अशा साहसी क्रीडा प्रकारांच्या सुविधा याठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. खाजगी संस्था आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने येथील व्यवस्थापन पाहिले जाते. साहसी खेळांसाठी शासनाकडून गेल्यावर्षी नियमावली तयार करण्यात आली असून त्यासाठी विशेष कौशल्य आणि परवान्याची आवश्यकता आहे. तसेच वनविभागाला हे केंद्र चालविण्यात अडचणी होत्या. त्यामुळे खाजगी संस्थेच्या सहकार्याने भागीदारी तत्वावर यंदाच्यावर्षी हे केंद्र सक्रीय होणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

माळशेजच्या पायथ्याशी पर्यटनाचे नवे आकर्षण 

मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटाच्या पायथ्याशी थितबी परिसरात वनविभागाकडून पर्यटन केंद्र विकसीत करण्यात आले असून त्या ठिकाणी पर्यटकांसाठी निवासाची आणि जेवणाची व्यवस्था कऱण्यात आली आहे. माळशेज परिसरातील हे क्षेत्र पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदु ठरत असताना या भागामध्ये साहसी क्रीडांना प्रोत्साहन देण्यासाठीही विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. शासनाच्या कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमाअंतर्गत या भागात साहसी पर्यटन क्षेत्रांचा विकास करण्याकडे भर देण्यात आली आहे. या भागात साहसी क्रीडासाठी लागणारी आवश्यक साधने, साहित्य उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. थितबी येथे आवश्यक असलेल्या केंद्राची उभारणी पूर्ण झाली असून आता हे केंद्र कार्यान्वित करण्यासाठी वनविभागाकडून साहसी खेळाचे कौशल्य, अभ्यास आणि परवानगी असणाऱ्या संस्थेचा शोध घेत आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असून त्यानंतर संस्थेची निवड केली जाणार आहे. त्यासाठी वनविभागाकडून घालण्यात येणाऱ्या अटीशर्ती पूर्ण करणाऱ्या संस्थेची या ठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे. या भागातील मार्केटिंग आणि व्यवस्थापनाची जबाबदारी संबंधित संस्थेकडे देण्यात येणार आहे.

पावसाळ्यात सुरू होणार  

माळशेज घाट परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्यामुळे येत्या महिन्याभरात हे केंद्र कार्यान्वित करण्याचा प्रयत्न वन विभागाच्या वतीने केला जात आहे. साहसी खेळांमध्ये पारंगत आणि कौशल्य असणाऱ्या संस्थेच्या शोधात वन विभाग आहे.


हेही वाचा – कोकण… पर्यटन आणि चित्रपटनिर्मिती

हेही वाचा – कोकणातील निसर्गरम्य पर्यटन


 

First Published on: June 22, 2019 7:29 PM
Exit mobile version