पुणे होर्डिंग दुर्घटना: दोन जणांना अटक

पुणे होर्डिंग दुर्घटना: दोन जणांना अटक

सदर घटनेचा फोटो

शुक्रवारी पुण्यातल्या शनिवार वाड्याजवळच्या जुना बाजार परिसरात होर्डिंगचा खांब कोसळून भीषण दुर्घटना घडली. याप्रकरणी पांडुरंग वनारे आणि संजय सिंग या दोन व्यक्तींना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. होर्डिंगला आधार देण्यासाठी बसवण्यात आलेले अँगल कापल्याने ही भीषण दुर्घटना घडली, ज्यामध्ये ४ जणांनी आपला जीव गमावला तर ७ जण गंभीर जखमी झाले. दरम्यान या दुर्घटनेनंतर मध्य रेल्वे प्रशासानासाने होर्डिंग लावणारी जाहिरात एजन्सी याला जबाबदार असल्याचा आरोप केला होता. मात्र, ज्या कंपनीकडे दुर्घटनाग्रस्त होर्डिंगचा ठेका होता त्यांनी मध्य रेल्वेलाच याप्रकरणी दोषी ठरवलं आहे. रस्त्याच्या मधोमध असलेलं हे होर्डिंग हटवण्यासाठी यापूर्वी मध्य रेल्वेशी केलेले पत्रव्यवहार जाहिरात एजंसीने पुरावे म्हणून सादर केले आहेत. या आरोप-प्रत्यारोपाच्या सदरामुळे पुण्यातील हे होर्डिंग दुर्घटना प्रकरण आता एक वेगळं वळण घेणार असल्याची चिन्हं दिसत आहेत.

नेमकी घटना काय?

पुण्याच्या शनिवारवाडा परिसरातील जुना बाजार चौकात शुक्रवारी दुपारी होर्डिंगचा मोठा लोखंडी खांब, खाली उभ्या असलेल्या रिक्षांवर कोसळला. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला तर ७ ते ८ जण गंभीर जखमी झाले. श्यामराव भगवानराव धोत्रे (४८), भीमराव कासार (७०), शिवाजी देविदास परदेशी (४०) आणि जावेद मिसबाऊद्दीन खान (४९) अशी घटनेतील मृतांची नावं आहेत. दरम्यान सर्व मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये नुकसान भरपाई देणार असल्याची घोषणा, रेल्वे प्रशासनाने केली आहे. याशिवाय दुर्घटनेत गंभीर जखमीं झालेल्यांना प्रत्येकी १ लाख, तर किरकोळ जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये देणार असल्याचंही रेल्वे प्रशासनाने जाहीर केलं आहे.


होर्डिंग दुर्घटना: काल आईचे निधन, आज वडिलांवरही काळाचा घाला

First Published on: October 6, 2018 10:41 AM
Exit mobile version