मुंबई – कोल्हापूर ‘उडान’ विमानसेवा बंद!

मुंबई – कोल्हापूर ‘उडान’ विमानसेवा बंद!

प्रातिनिधिक फोटो

मुंबई ते कोल्हापूर हवाई मार्गावर सुरु करण्यात आलेली विमानसेवा अखेर बंद करण्यात आली आहे. ‘उडान’ या योजनेंतर्गत कोल्हापूर- मुंबई विमानसेवा सुरु करण्यात आली होती. मात्र, विस्कळीत सेवेबाबत वारंवार तक्रारी आल्यामुळे केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालयाने एअर डेक्कन कंपनीच्या देशभरातील सर्वच मार्गांवरील विमानसेवा रद्द केली आहे. या कारवाईमुळे आता कोल्हापूरमधून नव्याने विमानसेवा सुरु करण्याचा मार्ग अन्य कपंन्यांसाठी खुला झाला आहे. उडान’ योजनेंतर्गत देशातील छोटी आणि मोठी शहरं विमानसेवेने जोडण्याचं काम, केंद्र सरकारकडून केलं जात आहे. या योजनेंतर्गत एअर डेक्कन कंपनीने १८ एप्रिल २०१८ ला मुंबई – कोल्हापूर विमानसेवा सुरु केली होती. ही विमानसेवा आठवड्यातून मंगळवार, बुधवार आणि रविवार असे तीन दिवस सुरु होती. गेल्या ५ ते ६ वर्षांपासून या विमानसेवेसाठी स्थानिकांकडून मागणी केली जात होती. दरम्यान, ही सेवा सुरु झाल्यामुळे लोकांनी त्याचं आनंदाने स्वागतही केलं होतं. मात्र, पहिल्याच आठवड्यापासून एअर डेक्कन कंपनीने अनियमित सेवा दिल्यामुळे लोक चांगलेच नाराज झाले होते. त्यामुळे बुकिंग केल्यानंतरही ऐनवेळी विमानाचं तिकीच रद्द करुन, प्रवासाचे पर्याय शोधावे लागत होते. इतकंच नाही तर तिकीट रद्द केल्यानंतर कंपनीकडून त्याचे पैसे परत देण्यासही विलंब लावला. त्यामुळे प्रवाशी चांगलेच संतापले होते.

१८ एप्रिल ते २ सप्टेंबर या काळात ही विमानसेवा केवळ ५० दिवसच सुरु राहिली. दरम्यान, कोल्हापूर-मुंबई मार्गावर ७२ सिटर विमान सुरु करावं अशी प्रवाशांची मागणी होती. सुरुवातीला मात्र एअर डेक्कनने १७ सिटरचेच विमान सुरु केले. कंपनीला या विमान सेवेसाठी एकूण तीन वर्षांसाठी स्लॉट मिळाला होता. अशातच ही सेवा आठवड्यातून केवळ तीन दिवसच चालायची. दरम्यान, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह नाशिकच्याही खासदारांनी अनियमित विमान सेवेमुळे एअर डेक्कन कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी केली होती.  यानुसार, हवाई उड्डाण मंत्रालयाने एअर डेक्कन कंपनीची देशातील सर्व मार्गांवरील विमान सेवा रद्द केली. आता या कारवाईनंतर अन्य विमान कंपन्यांना इथे विमानसेवा सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे हे मात्र खरं. दरम्यान, ‘उडान’ विमानसेवा बंद झाल्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणारे प्रवासी नाराज झाले आहेत. कोल्हापूर- मुंबई विमानसेवेमुळे प्रवाशांना कमी वेळात हे अंतर कापणं सोयीचं झालं होतं.

First Published on: November 21, 2018 8:42 PM
Exit mobile version