पार्थ पवारसाठी उदयनराजे भोसले मैदानात

पार्थ पवारसाठी उदयनराजे भोसले मैदानात

उदयनराजे भोसले आणि पार्थ पवार

मावळ लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे निवडणूक लढत आहेत. खर तर लोकसभेची ही निवडणूक पवार कुटुंबाच्या प्रतिष्ठेची झालेली पाहायला मिळत आहे. आज, शनिवारी सायंकाळी उदयनराजे भोसले हे पार्थ अजित पवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये सातारा परिसरातील मोठ्या प्रमाणावर नागरिक राहतात. त्यातील बहुतांश नागरिक हे शिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघात वास्तव्यास आहेत. उदयनराजेंची सभा ही पिंपरी-चिंचवडच्या प्राधिकरण येथील नियोजित महापौर निवास मैदान येथे होणार आहे. त्यांच्या सोबत स्वतः अजित पवार, शिवेंद्रराजे महाराज, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर, शशिकांत शिंदे या नेत्यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

आई-वडिल करताहेत प्रचार 

मावळ लोकसभेसाठी पार्थ अजित पवार यांचे नाव अधिकृतरित्या जाहिर करण्यात आले. तेव्हापासून शहरातील कार्यकर्ते उत्साहात असून त्याचा प्रचार जोमाने करत आहेत. ही निवडणूक पवार कुटुंबाच्या प्रतिष्ठेची झाल्याचं पाहायला मिळत असून आई सुनेत्रा पवार यांनी या निवडणुकीत स्वतः लक्ष देत पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी त्यांनी बैठका घेतल्या आहेत. तर जय पवार हे सोशल मीडिया हाताळत असून रोहित पवार यांनी देखील अनेक कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर वडील अजित पवार यांची मुलगा पार्थचा प्रचार करताना दमछाक होताना दिसत नाही. सध्या तरी उदयनराजे भोसले यांच्या सभेचा पार्थ अजित पवार यांना कितपत फायदा होतो हे पाहणं महत्वाचं आहे.

First Published on: April 13, 2019 11:59 AM
Exit mobile version