कार्यालयीन वेळांचं नियोजन करणं गरजेचं; नीती आयोगाच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा सल्ला

कार्यालयीन वेळांचं नियोजन करणं गरजेचं; नीती आयोगाच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आज निती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे आहे त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावं, असा सल्ला दिला. ‘कल करे सो आज कर, आज करे सो अभी’ अशी राज्य शासनाची भूमिका असून कोविड काळातही राज्य शासनाने विकास थांबविला नाही तर आलेल्या संकटावर मात करीत आम्ही मार्ग काढत होतो असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ते आज नीती आयोगाच्या सहाव्या बैठकीत बोलत होते.

कोविडचा लढा संपलेला नाही. आपणही व्हीसी वगैरेंच्या माध्यमातूनच भेटतो आहोत. कार्यालयीन वेळच्या बाबतीतही पारंपरिक १० ते ५ ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचं नियोजन करणं गरजेचं आहे त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावं असंही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आम्ही आपत्तीला संधीमध्ये बदलत आहोत. गेल्या वर्षभरात आपण माहिती तंत्रज्ञानावर भरपूर भर दिला असून इंटरनेट सुविधा सर्व गावांमध्ये पोहचणं आमचं उद्दिष्ट्य आहे. भारतनेटच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा जाळे पसरविणं सुरु असलं तरी अजून दुर्गम भागातील २५०० पेक्षा जास्त गावं व खेड्यांमध्ये इंटरनेट व मोबाईल कनेक्टिव्हीटी पोहचलेली नाही. केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालून ही सुविधा राज्याला लवकरात लवकर कशी मिळेल ते पाहावे असंही मुख्यमंत्री म्हणाले. गावोगावच्या नागरिकांना माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व सेवांचा जलद, चांगला लाभ मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत असंही ते म्हणाले.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही सुधारणा व्हावी म्हणून राज्य शासन प्रयत्न करीत असून केंद्राने अशा प्रकल्पांना प्राधान्याने साहाय्य करावे असंही मुख्यमंत्री म्हणाले

 

First Published on: February 20, 2021 6:16 PM
Exit mobile version