बृजभूषण सिंहांच्या पुणे दौऱ्याला मनसेचा विरोध नाही; वसंत मोरेंचं स्पष्टीकरण

बृजभूषण सिंहांच्या पुणे दौऱ्याला मनसेचा विरोध नाही; वसंत मोरेंचं स्पष्टीकरण

उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह पुढील महिन्यात पुणे दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्ताने बृजभूषण सिंह पुण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. त्यांच्या पुणे दौऱ्यावर मनसे कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं होतं. मात्र मनसेने भूमिका स्पष्ट केली आहे. बृजभूषण सिंहांच्या पुणे दौऱ्याला मनसेचा विरोध नाही, असं स्पष्टीकरण पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी दिलं आहे.

वसंत मोरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, बृजभूषण सिंह यांच्या पुणे दौऱ्याबाबत स्वत: राज ठाकरे यांनी भूमिका घेतली आहे. त्यांनी दौऱ्याला विरोध न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आम्ही बृजभूषण सिंह यांना पुण्यात प्रवेश देणार आहोत. राज ठाकरेंच्या आदेशाचं पालन करणं पक्षाच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं काम आहे, असं वसंत मोरे म्हणाले.

राज ठाकरेंनी जर आदेश दिले नसले तर बृजभूषण सिंह यांना महाराष्ट्रात पाय ठेवू दिला नसता, असंही वसंत मोरे म्हणाले. यापूर्वी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. मात्र काही काळानंतर त्यांचा विरोध मावळला होता. आता महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्ताने बृजभूषण सिंह पुण्यात येत आहेत. मात्र सिंह यांच्या पुणे दौऱ्याविषयी कुठल्याही मनसे नेता-पदाधिकाऱ्याने काहीही बोलू नका, असे आदेश राज ठाकरेंनी दिल्याचं वसंत मोरेंनी सांगितलं.


हेही वाचा : मुंबईत आज महारोजगार मेळावा, तरुणांना ८ हजार ६०८ जागांवर नोकरीची संधी


 

First Published on: December 9, 2022 7:54 PM
Exit mobile version