संजय राऊतांविरोधात हक्कभंग? ‘त्या’ वक्तव्यावरून विधानसभेत आमदार संतप्त

संजय राऊतांविरोधात हक्कभंग? ‘त्या’ वक्तव्यावरून विधानसभेत आमदार संतप्त

Assembly Budget 2023

Assembly Budget 2023 | मुंबई – विधिमंडळाला चोरमंडळ म्हटल्याने संजय राऊतांविरोधात (Sanjay Raut) विधिमंडळातून हक्कभंग येण्याची शक्यता आहे. विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस असून आजच्या दिवसाला सुरुवात होताच संजय राऊतांवर कारवाई करण्याच्या मागणीने सुरुवात झाली. विधिमंडळाला उज्ज्वल परंपरा आहे, त्यामुळे विधिमंडळाबाबत सरसकट असं वक्तव्य करणे म्हणजे विधिमंडळ सदस्यांचा अपमान करण्यासारखं आहे, असं भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले. तसंच, संजय राऊतांविरोधात हक्कभंग आणावा असा प्रस्ताव भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर मांडला. संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांनी आक्रमक भूमिका तर घेतलीच, शिवाय विरोधकांनीही म्हणजेच महाविकास आघाडीकतील नेत्यांनीही योग्य तो निर्णय घेण्याची सूचना केली आहे.

या सदनात बसलेल्या सदस्यांना चोर म्हणतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. माझी विनंती आहे की या पद्धतीने आपल्या सर्वांचा उल्लेख होणार असेल तर हे विधिमंडळ एक आहे की नाही, असा प्रश्न आहे. कोणीही बोटचेपी भूमिका घेणे अपेक्षित नाही असं आशिष शेलार म्हणाले. यावरून अतुल भातखळकर यांनीही हक्कभंग आणण्याची विनंती केली.

हेही वाचा – संजय राऊत किरीट सोमय्यांविरोधात जाणार कोर्टात, कोट्यवधींच्या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी

सत्ताधाऱ्यांनी संजय राऊतांविरोधात हक्कभंग आणण्याचा प्रस्ताव ठेवल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही प्रतिक्रिया आली. अजित पवारांनी उघडउघड संजय राऊतांविरोधात भूमिका घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. संजय राऊतांनी विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ करणं अपेक्षित नाही. पक्षीय भेदाभेद बाजूला ठेवून भूमिका घेतली जावी. विधिमंडळातील सदस्यांना मान राखला गेलाच पाहिजे. त्यामुळे विधिमंडळाला चोर म्हणणं चुकीचं आहे, असं म्हणत असताना त्यांच्याबाबत विधिमंडळाने योग्य ती भूमिका घ्यावी असं अजित पवार म्हणाले. तसंच, त्यांच्यावर कारवाई करण्याआधी त्यांच्या वक्तव्याची पडताळणी करावी अशी मागणीही त्यांनी केली.


देशद्रोही म्हणणंही चुकीचं आहे

विधिमंडळाला चोरमंडळ म्हणणं चुकीचंच आहे, मात्र, विरोधी पक्षातील सदस्यांना देशद्रोही म्हणणंही चुकीचं आहे असं काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले. संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्याची पडताळणी करून विधिमंडळाने त्यांच्याबाबत निर्णय घ्यावा असंही पुढे थोरात यांनी स्पष्ट केलं.

विधिमंडळ म्हणजे केवळ सत्ताधारी पक्ष नव्हे, निवडून आलेले सर्व पक्ष विधिमंडळात असतात. त्यामुळे त्यांवर हक्कभंग घेतलाच पाहिजे, असं शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांनीही आक्रमकपणे मागणी केली.

दरम्यान, अतुल भातखळकर यांनी ठेवलेला हक्कभंग प्रस्ताव वाचत असताना सभागृहात गोंधळ झाला. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांना सभागृहात गोंधळ केल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले.

First Published on: March 1, 2023 11:29 AM
Exit mobile version