नमाज पठणादरम्यान दोन मुस्लीम गट आपापसात भिडले, लोखंडी रॉड, हॉकी स्टीकने फोडली एकमेकांची टाळकी

नमाज पठणादरम्यान दोन मुस्लीम गट आपापसात भिडले, लोखंडी रॉड, हॉकी स्टीकने फोडली एकमेकांची टाळकी

संग्रहित छायाचित्र

राज्यात कोरोना विषाणूचा दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता राज्यात ठिकठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी संचारबंदी तर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अशातच मुस्लिम बांधवांचा रमझान महिना असल्याने नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम बांधव मशिदीत जात आहे. मात्र नमाज पठणादरम्यान जास्त लोक एकत्र आल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढू शकतो, हा धोका लक्षात घेत
मशिदीत गर्दी करू नका, असं सांगत नमाज पठण करण्यापासून रोखल्याने दोन मुस्लीम गटात आपापसात भिडल्याची घटना नंदुरबार जिल्ह्यातून समोर आली आहे.

नंदुरबार शहरातील चिराग मशिदीसमोर ८ मे रोजी रात्रीचा सुमारास ही हाणामारी झाली. यावेळी लोखंडी रॉड, लाकडी दांडे आणि हॉकी स्टिकनं हल्ला करत दोन्ही गटांनी एकमेकांची टाळकी फोडली आहेत. या हाणामारीत दोन्ही गटातील सहा जण जखमी झाले आहेत. याघटनेमुळे नंदुरबार शहरातील चिराग अली मशिद परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करत शांतता प्रस्थापित करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केली आहे. तर पोलिसांनी अद्याप १२ जणांना अटक केली असून अन्य ९ जणांचा शोध घेत आहे.

यासंदर्भात समोर आलेल्या माहितीनुसार, ८ मे रोजी रात्री शहरातील मुस्लीम बांधव चिराग अली मशिदीसमोर नमाज पठणासाठी आले होते. यावेळी मशिदीसमोर गर्दी करू नका. आतमध्ये एकावेळी फक्त पाच जणांनाच प्रवेश आहे. असे आवाहन करण्यात आले. त्यानंतर नमाज पठण करण्यापासून रोखल्यामुळे एक जमाव दुसऱ्या जमावातील लोकांचा अंगावर धावून गेला. त्यानंतर काही वेळात दोन्ही गटात बाचाबाची सुरू झाली आणि याचं रुपांतर तुंबळ हाणामारीत झालं. याप्रकरणी नंदूरबार पोलीस अधिक तपास करीत आहेत.


 

First Published on: May 10, 2021 6:02 PM
Exit mobile version