आम्ही १५ कोटी आहेत पण १०० कोटींना भारी पडू

आम्ही १५ कोटी आहेत पण १०० कोटींना भारी पडू

एमआयएम आमदार वारिस पठाण

आम्ही १५ कोटी आहोत. पण १०० कोटींना भारी पडू, असे एमआयएमचे नेते आणि भायखळाचे माजी आमदार वारिस पठाण यांनी म्हटलं आहे. भायखळ्याचे माजी आमदार असलेले वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारीला कर्नाटकातल्या गुलबर्गामध्ये भाषण केले. या सभेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात आंदोलने सुरू आहेत. सीएए, एनआरसीविरोधात दिल्लीत असलेल्या शाहीन बागेत गेल्या दोन महिन्यांपासून मुस्लिम महिलांनी ठिय्या दिला आहे. यावरुन एमआयएमचे नेते आणि माजी आमदार वारिस पठाण यांनी मुस्लिमांना चिथावणी देणारे विधान केले आहे.

आपल्याला स्वातंत्र्य मिळवावे लागेल. जी गोष्ट मागून मिळत नसेल, ती हिसकावून घ्यावी लागेल. आता ती वेळ आलेली आहे. आम्ही माता, भगिनींना पुढे करतो, असे ते म्हणतात. आता तर फक्त सिंहिणी बाहेर पडल्या आहेत आणि तरीही तुम्हाला घाम फुटला आहे. आम्हीदेखील त्यांच्या सोबत बाहेर पडलो, तर काय होईल याचा विचार करा. आम्ही १५ कोटी आहोत. मात्र १०० कोटींवर भारी पडू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा,असे वादग्रस्त विधान पठाण यांनी केले आहे.

वारिस पठाण यांच्या विधानावर भाजपा , शिवसेनेने टीकेची झोड उठवली. पठाण यांनी जनतेला आव्हान देऊ नये. त्यांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, अशा शब्दांत विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पठाण यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. शिवसेनेनंदेखील पठाण यांच्या विधानाचा समाचार घेतला.

पठाण यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. कर्नाटकमध्ये त्यांनी हे विधान केलं. कर्नाटकात आणि केंद्रात भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी पठाण यांच्यावर कारवाई करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून काही लोकांना कंठ फुटायला लागले आहेत, कर्नाटकात भाजपाचं सरकार आहे त्यांनी तिथल्या तिथे कठोर कारवाई वारिस पठाण यांच्यावर करायला हवी अशी मागणी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे.

First Published on: February 21, 2020 6:57 AM
Exit mobile version