आम्ही कुठल्याही पक्षात विलीन होणार नाही, बाळासाहेबांचं नाव न वापरण्यावर केसरकर म्हणतात…

आम्ही कुठल्याही पक्षात विलीन होणार नाही, बाळासाहेबांचं नाव न वापरण्यावर केसरकर म्हणतात…

deepak kesarkar

मुंबईः बाळासाहेबांचं नाव वापरायचं नाही, असं जर निवडणूक आयोगानं सांगितलं तर त्याचं पालन केलं जाईल. आमच्या पक्षाचं नाव शिवसेना बाळासाहेब ठेवलं पाहिजे, पण यांचं म्हणणं आहे की तुम्ही बाळासाहेबांचं नाव वापरू शकत नाही. त्यांच्या म्हणण्याचा आम्ही निश्चित विचार करू, आम्ही कुठल्याही पक्षात विलीन होणार नाही, असं शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर म्हणालेत. दीपक केसरकर यांनी झूमद्वारे प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.

एकीकडे आम्ही महाराष्ट्रात आलो पाहिजे, असं म्हणतात आणि दुसरीकडे राऊत बोलतात आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब मोडतोड बंद करून सगळ्यांना कायद्याचं पालन करायला लावलं पाहिजे. महाराष्ट्रातील ही परिस्थिती बदलेल तेव्हा आम्ही मुंबईत येऊ, आमचा गट स्थापन करण्याचा आम्हाला घटनात्मक अधिकार आहे. आमचा घटनात्मक अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे. महाराष्ट्रात घटनेचं उल्लंघन झाल्यास कोर्टाचा मार्ग मोकळा आहे. आकडा आहे पण महाराष्ट्रात सध्या येतं सुरक्षित वाटत नाही. महाराष्ट्र पेटवण्यात आलेला आहे. ज्या व्यक्तीनं रस्त्यावर उतरायला सांगितलेलं आहे, त्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई महाराष्ट्र शासनाने केलेली नाही. असं दुसरं कोणी सांगितलं असतं रस्त्यावर उतरा आणि दंगली करा, तर तुम्ही त्याला सोडलं असतं का? मी त्या खात्याचा मंत्री राहिलेलो आहे, ताबडतोब तुम्ही त्याच्यावर कारवाई केली असती ना. शेवटी लॉ अँड ऑर्डर फेल्युअर व्हायला देऊ नका, असंही दीपक केसरकर म्हणालेत.

महाराष्ट्रातून निघाल्यानंतर कमी वेळा बोलण्याची संधी मिळाली. एकनाथ शिंदेंनी आम्हाला संपर्क साधायला सांगितलं आहे. बऱ्याचदा कम्युनिकेशन नसलं की लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतात. हे गैरसमज निर्माण झाल्यानंतर त्याच उत्तर देणं आवश्यक असतं. एक गैरसमज असा आहे की, आम्ही शिवसेनेमधून बाहेर पडलेलो आहोत. आम्ही अजूनही शिवसेना पक्षाचेच सदस्य आहोत. आम्ही सर्वजण शिवसेना पक्षाचे सदस्य आहोत. परंतु अनेक वेळा असं होतं की पक्षांच्या आमदारांची जी मतं असतात, या मताप्रमाणे काही निर्णय व्हायला लागतात. त्यांचे काही अधिकार असतात. त्यांच्या मतदारसंघात विविध कामे व्हावीत अशी त्यांची अपेक्षा असते, असंही केसरकर म्हणालेत.

सरकार चांगलं चालावं ही आपली जबाबदारी आहे. म्हणून आम्ही अनेक वेळा आमच्या पक्षप्रमुखांना सुचवलेलं होतं की, आपण एक निर्णय घेऊया, ज्या युतीमध्ये आपण लढलो, त्याच्याच बरोबर आपण राहू यात, असा एक निर्णय सर्व आमदारांनी मिळून घेतलेला होता. कित्येक दिवस आम्ही उद्धव ठाकरेंना हे सांगत होतो. आमची अजूनही अशी समजूत आहे की ते पुढेसुद्धा आमचं ऐकतील. ज्या वेळेला एवढी लोक सांगतात, एवढी लोक एकत्र येतात. त्यावेळी त्याच्यात काही तरी सबस्टेन्स असणार, त्याच्यात काही तरी असं आहे जे सर्व लोकांना खटकलेलं आहे. याच्यामध्ये कोणीच आम्हाला असं सांगितलेलं नाही, असं करा म्हणून, शिंदे साहेब नेते म्हणून आम्हाला उद्धव ठाकरेंनी दिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात सर्व आमदार होते. सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपलं मत असंच ठेवावं. तुम्हाला तुमचं मत वेगळं मांडायचं असेल तर तुम्हाला दोन तृतीयांश बहुमत लागतं. ते दोन तृतीयांश बहुमत आमच्याकडे आहे. त्याच्यामुळे पूर्वी नेते बदलण्याच्या मीटिंग झाल्या, त्यात 16 ते 17 आमदार त्यात होते. त्यावेळेला जेवढे आमदार निवडून आलेले असतात, ते पक्षाचं आणि गटाचं नाव नोंदणी करतात. तेव्हा आमची संख्या 56 होती, ती आता 55 झालेली आहे. 55 आमदारांचा नेता बदलायचा असेल तर तो 16 लोक एकत्र येऊन नेता बदलू शकत नाही. जो काही निर्णय उपाध्यक्षांनी दिलेला आहे, त्या निर्णयाला आम्ही चॅलेंज करणार आहोत. तो निर्णय आम्हाला मान्य नाही. विधिमंडळात शिवसेनेचे नेतृत्व एकनाथ शिंदे करीत आहेत. कोणीही आपला पक्ष सोडलेला नाही. आम्ही बाळासाहेबांचा विचार मांडणारी लोक एकत्र आलेलो आहोत, त्यामुळे आम्ही गटाचं नाव मागितलेलं नाही. शिवसेनेचे हे जे सदस्य आहेत, त्यातील आमचे सदस्य दोन तृतीयांशपेक्षा जास्त असल्याने त्याचे नेते हे एकनाथ शिंदे असतील. आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न योग्य नाही. आम्ही कोणीही पक्ष सोडलेला नाही. लोकांनी रस्त्यावर उतरण्याची भाषा चुकीची आहे. शिवसैनिकांनी रस्त्यावर येण्याची काहीही गरज नाही. सांगितलं जातं आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी आहे. निश्चितपणे तुम्ही ती समजून घ्याल, बाळासाहेबांचा विचार निश्चितपणे पुढे नेला जाईल, असंही दीपक केसरकरांनी अधोरेखित केलंय.

आम्ही शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलोलो आहोत. आम्ही शिवसेनेचे आणि विधिमंडळाचे सदस्य आहोत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं बहुमत संपलेलं आहे. आता जे काही बोलायचं असेल त्याचे अधिकार शिंदे साहेबांना दिलेले आहेत. शिंदे साहेब आपल्या पक्षाच्यासुद्धा संपर्कात आहेत. त्यामुळे त्यांना जो काही निर्णय घ्यायचा आहे तो ते घेऊ शकतील. पण कुठल्याही परिस्थितीत आमचा पाठिंबा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नाही. बाळासाहेबांचं नाव वापरायचं नाही, असं तर निवडणूक आयोगानं सांगितलं तर त्याचं पालन केलं जाईल. आमच्यापैकी कोणीही दुसऱ्या पक्षात गेलेला नाही. आम्ही कशाला कोणाचा पाठिंबा काढू, आम्ही शिवसेना म्हणून निवडून आलेलो आहोत. आम्ही दोन तृतीयांश बहुमत सिद्ध करू. शिवसेनेला कोणीही हायजॅक केलेले नाही. आम्ही शिवसेनेच्याच विचाराचे आहोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं शिवसेनेला हायजॅक करण्याचा प्रयत्न केला होता. शिवेसनेचं अस्तित्व टिकावं म्हणून हा प्रयत्न केलेला आहे. अँटी डिफेशन लॉ लागून होत नसतात ओढून ताणून तो लावणं ही लोकशाहीची हत्या आहे, असाही टोला त्यांनी लगावला आहे.


हेही वाचाः …तर स्वतःच्या बापाच्या नावानं मतं मागा, उद्धव ठाकरेंचा बंडखोरांवर हल्लाबोल

First Published on: June 25, 2022 5:22 PM
Exit mobile version