…तर स्वतःच्या बापाच्या नावानं मतं मागा, उद्धव ठाकरेंचा बंडखोरांवर हल्लाबोल

शिवसेना कार्यकारिणीत नेत्यांनी शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना पुन्हा पक्षात स्थान देऊ नका, अशी सूचना केली, त्याला उत्तर देतानाही उद्धव ठाकरेंनी त्यांना परत घेणार नसल्याचं स्पष्ट केलंय.

uddhav thackeray

मुंबईः शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनात राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतलीय. त्या बैठकीत त्यांनी उद्धव ठाकरेंनी शिंदेंबरोबर गेलेल्या बंडखोरांना चांगलेच फटकारले. विशेष म्हणजे बंडखोरांना त्यांनी स्वतःच्या बापाचं नाव लावून मतं मागण्याचा सल्ला दिलाय. स्वतःच्या बापाच्या नावानं मतं मागा, आधी नाथ होते, आता दास झाल्याचा टोलाही त्यांनी बंडखोर आमदारांना लगावलाय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. शिवसेना कार्यकारिणीत नेत्यांनी शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना पुन्हा पक्षात स्थान देऊ नका, अशी सूचना केली, त्याला उत्तर देतानाही उद्धव ठाकरेंनी त्यांना परत घेणार नसल्याचं स्पष्ट केलंय. तसेच शिवसेना हा निखारा असून, त्यावर पाय ठेवल्यास जाळून टाकू, असा इशाराही त्यांनी दिलाय.

या कार्यकारिणीत पाच प्रस्ताव मान्य करण्यात आले असून, निर्णयाचे सर्वाधिकार हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना देण्यात आले आहेत. तसेच बंडखोरांची सध्या हकालपट्टी होणार नसून त्यांच्यावरील कारवाईचे सर्वाधिकार उद्धव ठाकरेंना बहाल करण्यात आले आहेत. मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाशी कधीही प्रतारणा करणार नसल्याचंही कार्यकारिणीत ठरवण्यात आल्याचीही माहिती मिळतेय.

दुसरीकडे बाळासाहेबांचं नाव वापरू नका, या उद्धव ठाकरेंच्या विधानावरूनही वाद ओढवण्याची शक्यता आहे. कारण बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रपुरुष आहेत. त्यामुळे राष्ट्रपुरुषाचे नाव वापरण्याचा सामान्य जनता आणि इतर नागरिकांना वापरण्याचा अधिकार असतो. बाळासाहेब ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रासह मुंबईत आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरून आता शिवसेनेत बाळासाहेब गट आणि दुसरा (उद्धव) गट असे दोन गट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा स्थितीत यातून अधिकाधिक शिवसैनिक आपल्या गटाशी भावनिकरीत्या जोडले जातील, असा एकनाथ शिंदे गटाचा अंदाज आहे. तसेच एकनाथ शिंदे ही लढाई विधानसभा आणि कायदेशीररीत्या लढणार आहेत. आपल्या गटाच्या हालचाली जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आज प्रवक्त्यांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी शिंदे गटाची एक बैठकही होणार आहे. त्यामुळे आता ही लढाई सर्वोच्च न्यायालयात लढली जाणार असून, शिंदे गटाला मान्यता मिळण्याचाही अंदाज कायदेतज्ज्ञ वर्तवत आहेत.


हेही वाचाः स्वतंत्र शिंदे गटाला लवकरच नवीन नावाने मान्यता, 3 जुलैला नवं सरकार येणार-सूत्र