Weather Update: पुढील ४ दिवस राज्यात कडाक्याची थंडी पडणार, हवामान खात्याचा इशारा

Weather Update: पुढील ४ दिवस राज्यात कडाक्याची थंडी पडणार, हवामान खात्याचा इशारा

महाराष्ट्राला हिवाळ्याची चाहूल लागली आहे. मागील काही दिवसात राज्यात पाऊस झाला होता त्यानंतर आता खऱ्या अर्थाने हिवाळ्याला सुरुवात होत आहे. दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात वातावरणात गारवा जाणवायला लागला आहे. पुढील ४ दिवस राज्यात कडाक्याची थंडी पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश भागातील तापमान २-३ डिग्री सेल्सियसने घसरणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. राज्यासह पुढील ४-५ दिवस भारतातील वायव्य आणि मध्य भारत तसेच गुजरातच्या बहुतेक भागांमध्ये देखील कडाक्याची थंडी पडणार आहे. या भागातील तापमानात २-४ अंश सेल्सियसने घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील ४-५ दिवस राज्यासह देशात नागरिक कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेता येणार आहे.

 

मुंबईसह नवी मुंबईत धुक्याचे वातावरण 

आज मुंबईसह ठाणे नवी मुंबईच्या अनेक भागांमध्ये सकाळी धुक्याचे वातावरण पहायला मिळाले. तर राज्यातील तापमान देखील खाली आल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. महाराष्ट्रात आज म्हणजेच १६ डिसेंबर रोजी नागपूरातील तापमानाचा पारा १२.४ अंश सेल्सियसने खाली आला होता. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील नांदेड, परभणीच्या आसपासच्या भागात १४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. तसेच राज्यातील इतर भागांमध्ये किमान तापमान १४ – १६ अंश सेल्सियस होते. भारतीय हवामान खात्याच्या पुर्वानुमानानुसार येत्या २-३ दिवसात तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे.


पुढील काळात उत्तर आणि मध्य भारतातील बहुतांश भागातील तापमानात विशेष बदल होणार आहेत. त्यानंतर तापमानात हळू हळू घट होणारआहे. महाराष्ट्रातील उत्तर – मध्य व संलग्न मराठवाडा तसेच विदर्भात थंडीचा सर्वाधिक प्रभाव जाणवणार आहे.

दिल्लीत तापमानात घट

राजधानी दिल्लीतही गेल्या २-३ दिवसांपासून थंडी सुरू झाली आहे. बुधवारी दिल्लीत किमान तापमान ७.८ अंश सेल्सियस तर कमाल तापमान हे २२.५ अंश सेल्सियस होते. येत्या काळात दिल्लीतही कडाक्याची थंडी पडणार आहे. दिल्लीत सध्या प्रदूषणामुळे वातावरण प्रचंड दूषीत झाले आहे. त्यामुळे दिल्लीच्या रस्त्यावर धुके आहेत की दूषित वातावरण याचा अंदाज येत नाही.


हेही वाचा – पंचवटीत सिलिंडर स्फोटाचा थरार

First Published on: December 16, 2021 6:29 PM
Exit mobile version