कुष्ठरोग बरा होत नसल्याने पतीचा पत्नीने केला खून; प्रियकर, मुलाची मिळाली साथ

कुष्ठरोग बरा होत नसल्याने पतीचा पत्नीने केला खून; प्रियकर, मुलाची मिळाली साथ

दामोदर फाळके यांचा खून केलेले आरोपीला जेरबंद केल्यानंतर तळेगाव दाभाडे पोलीस

कुष्ठरोग बरा होत नसल्याने पतीचा मुलांच्या आणि प्रियकराच्या मदतीने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात घडली. दामोदर तुकाराम फाळके असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अगोदर हा अपघात असल्याचा बनाव करत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तशी तक्रार देण्यात आली. तळेगाव पोलिसांना संशय आला होता त्यानुसार शवविच्छेदन अहवालात देखील जखमा या अपघाताच्या नसून मारहाणीच्या असल्याचे समोर आले. त्यानुसार पत्नी, दोन मुलं आणि प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नी दामिनी दामोदर फाळके, प्रियकर राजेश सुरेश कुरुप (वय ४५), मुलगा वेदांत दामोदर फाळके (वय १८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात २२ तारखेला कुष्ठरोग पीडित दामोदर यांचा अपघात झाला असल्याचा बनाव चार जणांनी रचला होता. त्यानुसार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे आणि मयुर वाडकर यांना त्यांच्या बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, दामोदर यांचा झालेला अपघात नसून तो खून असल्याचे समजते. मयत दामोदर तुकाराम फाळके यांची पत्नी दामिनी आणि राजेश कुरुप यांच्यात गेल्या १२ वर्षांपासून अनैतिक संबंध होते. दामोदर यांचा खून त्यांच्या कुटुंबातीलच व्यक्तींनी केला असल्याचं खात्रीशीर माहिती मिळाली.

त्यानुसार सदर माहितीच्या आधारे गुन्हे शाखा पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. आरोपी राजेश, मयत यांचा मुलगा वेदांत फाळके आणि त्याच्या अल्पवयीन भावाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता मयत दामोदर यांची पत्नी दामिनी फाळके आणि राजेश सुरेश कुरूप यांचे गेल्या १२ वर्षापासून अनैतिक संबंध आहेत. दामोदर यांना कुष्ठरोग असल्याने तो दामिनी आणि त्यांचा दोन मुलांना होईल असे वाटत होते. तसेच दामोदर याचे औषधोपचारांकरीता फाळके कुटुंबिय कमावत असलेले पैसे कमी पडत होते. त्यामुळे इतर नातेवाईकांकडून १२ लाख रुपये उसने घेतले होते. ही रक्कम देण्याकरिता दामोदर हे कोणतीही मदत करत नव्हते.

दामोदर यांच्यावर उपचार करून देखील कुष्ठरोग बरा होत नव्हता. त्यामुळे त्यांचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. सदरची कारवाई गुन्हे शाखा, युनिट-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहा पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे, मयुर वाडकर, धनराज किरनाळे, फारुक मुल्ला, संदिप ठाकरे, स्वामीनाथ जाधव, वसीम शेख, दयानंद खेडकर, ज्ञानेश्वर गाडेकर, भरत माने, धनंजय भोसले, श्यामसुदर गुट्टे, गोपाळ ब्रम्हांदे, आशा जाधव, नागेश माळी आणि अतुल लोखंडे यांनी केली आहे.

First Published on: December 8, 2019 5:11 PM
Exit mobile version