पाच राज्यांतील निवडणुकांचे निकालही असेच लागतील काय? संजय राऊतांनी भाजपाला डिवचले

पाच राज्यांतील निवडणुकांचे निकालही असेच लागतील काय? संजय राऊतांनी भाजपाला डिवचले

मुंबई : अहमदाबादच्या ‘मोदी’ स्टेडियमवर झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने असा खेळ केला की, भारतीय जनता पक्षाच्या मनसुब्यांवर सपशेल पाणी पडले. पाच राज्यांतील निवडणुकांचे निकालही अशाच पद्धतीने लागतील काय? असा सवाल करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाला डिवचले.

हेही वाचा – मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी; ‘या’ जिल्ह्यांत पाऊस

पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल देशासाठी निर्णायक ठरतील. पण पाच राज्यांचे निकाल हे ‘मोदी स्टेडियम’वरील विश्वचषक निकालाप्रमाणेच लागतील, अशी हवा आहे. 19 नोव्हेंबरला विश्वचषक क्रिकेट सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला. अंतिम सामना अहमदाबाद येथे झाला. भारतीय संघ जिंकणारच अशा आत्मविश्वासाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अंतिम सामना बघण्यासाठी स्टेडियमवर हजर होते. भारतीय संघ जिंकेल, पंतप्रधान मोदींच्या हस्ते विश्वचषक भारतीय संघास देण्याचा राजकीय सोहळा पार पडेल आणि ठरल्याप्रमाणे देशभरातील भाजप कार्यालयांसमोर विजयोत्सव साजरा केला जाईल, असे एकंदरीत नियोजन ठरलेच होते, पण ऑस्ट्रेलियाच्या संघाने ‘माती’ खाल्ली नाही, असेच म्हणावे लागेल, अशी खोचक टीका खासदार संजय राऊत यांनी सामना दैनिकातील आपल्या ‘रोखठोक’ सदरातून केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शहा हे गेला महिनाभर राजधानी दिल्लीला वाऱ्यावर सोडून राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ तसेच तेलंगणाच्या प्रचार दौऱ्यात गुंतून राहिले. देशासमोर अनेक समस्या आहेत, पण पाच राज्यांच्या निवडणुका जिंकणे यापलीकडे मोदी-शहांचे मन फिरताना दिसत नाही, असे खासदार राऊत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – संविधान बदलणं म्हणजे घरातील भांडं बदलण्या इतकं…; प्रकाश आंबेडकर गरजले

महाभारताचा दाखला

कौरव आणि पांडवांचे युद्ध हे धर्मयुद्ध होते असे आजही मानले जाते. कौरव-पांडवांच्या युद्धाच्या आधी युधिष्ठिर एकटाच पायी रणांगण पार करून समोरच्या शत्रू सेनेत उभ्या असलेल्या आपल्या सग्या-सोयऱयांना युद्ध करण्याविषयी आज्ञा विचारायला जातो. भीष्म पितामहांना प्रणाम करून तो विचारतो – “मला तुमच्याशी लढायचंय. युद्धाची आज्ञा आणि विजयाचा आशीर्वाद द्या.”

भीष्म पितामह उत्तर देतात, “या युद्धात माझं शरीर दुर्योधनाकडे राहील. कारण मी त्याचं अन्न खाल्लंय, पण धर्माने युक्त असलेलं माझं मन मात्र तुमच्याकडे असेल. ते तुमची मंगल कामना करेल. तुमच्या विजयाची आकांक्षा ठेवेल.” युधिष्ठिरानं अशाच प्रकारे गुरू द्रोणाचार्यांना आणि कृपाचार्यांनाही वंदन केले. आज असे धर्म व योद्धे राहिले नाहीत, असे संजय राऊत यांनी सुनावले आहे.

हेही वाचा – ओबीसी नेत्यांनी माझ्या नादाला लागू नये; प्रकाश आंबेडकरांचा भुजबळाना थेट इशारा

अहमदाबादच्या ‘मोदी’ स्टेडियमवर सरकारचे भीष्म, कृपाचार्य, द्रोणाचार्य येऊन बसले, पण त्यामुळे प्रत्यक्ष मैदानावरील योद्ध्यांच्या मनावर इतके दडपण आले की, ते पराभूत झाले. भारतीय जनता पक्षाने विजयोत्सवाची केलेली तयारी वाया गेली. या देशात जे काही बरे घडते आहे ते फक्त एकाच व्यक्तीमुळे, अशी अंधश्रद्धा पसरवली तरी क्रिकेट विश्वचषक आपण जिंकू शकलो नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

First Published on: November 26, 2023 10:07 AM
Exit mobile version