मविआच्या काळात MIDC मध्ये 3 हजार कोटींचा घोटाळा; भातखळकरांचा आरोप, भास्कर जाधव संतापले

मविआच्या काळात MIDC मध्ये 3 हजार कोटींचा घोटाळा; भातखळकरांचा आरोप, भास्कर जाधव संतापले

राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात एमआयडीसीमध्ये ३ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आज भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत केला आहे. तसेच याप्रकरणी एसआयटीची स्थापना करत सुभाष देसाई आणि भूषण सुभाष देसाई यांची चौकशी करा, अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे. मात्र यावेळी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव अध्यक्षांवर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. हरकतीचा मुद्दा उपस्थित करूनही बोलण्यास संधी न दिल्यामुळे भास्कर जाधव भडकले. तसेच कोणत्याही प्रकरणावर एसआयटी चौकशीच्या सत्ताधाऱ्यांच्या मागणीवरही त्यांनी आक्षेप घेतला.

 मविआच्या काळात MIDC मध्ये 3 हजार कोटींचा भ्रष्टाचार, भातखळकरांचा आरोप 

विधानसभेत बोलताना अतुल भातखळकर म्हणाले की,  राज्यात आमदार निवडण येतात, काही जण मंत्री बनतात, मंत्र्याने गोपनियतेची शप्पथ घेतलेली असते. मंत्री राज्याच्या हिताचे काम करत असतो. गेल्या सरकारच्या काळातील एमआयडीसीच्या कारभाराची काही माहिती माझ्याकडे आहे. एमआयडीसीच्या नियमानुसार, एमआयडीसीची कुठलीही जागा जी औद्योगिक उद्देशाने मूलता राखीव असते, ती थेट रहिवासी क्षेत्रात परावर्तित करता येत नाही. औद्योगिक जागा आधी व्यावसायिक करावी लागते. मग त्याची आवश्यकता असेल तर ती रहिवासी करता येते. पण अडीच वर्षाच्या काळात महाराष्ट्रातील एमआयडीसीचे आकडे गंभीर आहे, एमआयडीसीची 4 लाख 14 हजार स्वेअर मीटर एवढी जागा जी औद्योगिक कारणासाठी राखीव होती ती जागा थेट बेकायदेशीरपणे रहिवासी वापराकरिता परावर्तित केली, असा गंभीर आरोप भातखळकर यांनी केला आहे.

याप्रकरणी सुभाष देसाई, भूषण सुभाष देसाईंची चौकशी करा 

या जागेचा बाजार भाव 3 हजार 109 कोटी आहे. कायदा पायदळी तुडवून जमिनीचे परावर्तन केलं. जमिनीच्या आरक्षणात बदल केला. ज्यातून राज्याला महसूलातून 3 हजार 109 कोटी मिळाले पाहिजे होते त्याऐवजी राज्याला फक्त 168 कोटी मिळतात. यात 3 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. भूषण सुभाष देसाई कोण आहेत? सॉफिटलला बसवून कोणते व्यवहार होत होते? भूषण सुभाष देसाईची चौकशी झाली पाहिजे. काय गतिमान सरकार होते… एका दिवशी सहा सहा ऑर्डर घेतल्या. बेकायदेशीरपणे झालेल्या राज्यातील महसूलाच्या लुटीप्रकरणी एसआयटी चौकशी झाली पाहिजे. आणि सुभाष देसाई आणि भूषण सुभाष देसाई यांची चौकशी झाली पाहिजे. तसेच हे पैसे मातेश्रीपर्यंत गेले का याचीपण चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.

भास्कर जाधव यांचा आक्षेप

मात्र भातखळकरांच्या या मुद्द्यावर आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला आहे. भास्कर जाधव म्हणाले की, हे सभागृह नियमाने चालेल असा उल्लेख सातत्याने होत असतो, पण सभागृहात अशाप्रकारे कोण वक्तव्य करत असेल, आणि त्यावर जर हरकतीचा मुद्दा उपस्थित केला, तर हरकतीचा मुद्दा मांडण्यास संधी दिली जाते. तो हरकतीचा मुद्दा बरोबर असेल तर मान्य करा, अमान्य असेल तर फेटाळून लावा, पण हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्यास संधी दिली जात नाही, असा आरोप जाधव यांनी केला आहे.

भातखळकरांना कोणत्या नियमानुसार बोलण्यास दिलं, सभागृहासमोर तो विषय नाही, सभागृहात त्याविषयावर चर्चा नाही. अशावेळी कधीही कोणी उठून बोलत आहे. परवा पार्टमेंटमध्ये एका विषयावर चर्चा झाली इथले एक सदस्य उठले त्यावर एसआयटी, काय चालयं काय? यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तुमच्या कारकिर्दीला डाग लागणार आहे. संख्याबळावर जोरावर माझं तोंड बंद करु शकता पण जे बेकायदेशीर सुरु आहे ते दाखवू शकत नाही, अशी आक्रमक भूमिका भास्कर जाधव यांनी मांडली. ज्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी होणार 

अतुल भातखळकर यांनी मविआच्या काळात MIDC मध्ये 3 हजार कोटींचा घोटाळ्याच्या केलेल्या आरोपांची उच्च स्तरीय चौकशी केली जाईल आणि पुढील अधिवेशनात यासंदर्भात सविस्तर अहवाल सादर करु अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.


गायरान जमिनीचं वाटप नियमबाह्य; विद्यमान मंत्र्यांची चौकशी करा, अजित पवारांची मागणी

First Published on: December 29, 2022 6:31 PM
Exit mobile version