आठ वर्षाच्या चिमुकलीवर झाल्या वीस शस्त्रक्रिया

आठ वर्षाच्या चिमुकलीवर झाल्या वीस शस्त्रक्रिया

सिमरन

जोगेश्वरीत राहणारी आठ वर्षांची सिमरन किचनमध्ये खेळत असताना तिने घातलेल्या नायलॉनच्या पायजमाने अचानक पेट घेतला. या अपघातात सिमरन ४८ टक्के भाजली. १ जानेवारील ही घटना घडली. तिच्यावर तात्काळ जोगेश्वरीच्या स्थानिक नर्सिंग होममध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले.

मुलीचे वय लक्षात घेता तिला ५ जानेवारीला मीरा रोडच्या फॅमिली केयर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.  हॉस्पिटलमधील प्लास्टिक सर्जन डॉ. प्रताप नादार यांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले. सीमरनच्या  भाजलेल्या जखमा या फार खोल होत्या, तसेच जंतुसंसर्ग  झाल्यामुळे  तिला सेप्टिसिमीया झाला होता. त्यामुळे तिच्यावर तात्काळ उपचार करुन जखमा भरणं हे डॉक्टरांपुढे आवाहन होतं. त्यानुसार, तिच्या भाजलेल्या त्वचेवर वीस शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

यासंदर्भात अधिक माहिती देताना प्लॅस्टिक सर्जन डॉ. प्रताप नादार म्हणाले की, “मुलगी लहान असल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करणं अवघड होतं. या रुग्णालयात आणलं तेव्हा तिची प्रकृती खूपच बिकट होती. पण कुटुंबियांच्या परवानगीनुसार आम्ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महागडी औषधं, नवीन रक्त चढवणं अशा अनेक उपाय करता करता तिच्या भाजलेल्या त्वचेवर वीस शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दोन महिने या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू होते. आता तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असून तिला घरी सोडण्यात आलं आहे.”

‘‘सिमरनचे वडील हे मध्यवर्गीय असून टेम्पो ड्रायव्हर आहेत. मुलीवर झालेल्या लाखो रुपयांचा वैद्यकीय खर्च त्यांना परवडण्याजोगा नव्हता. यासाठी हॉस्पिटल व्यवस्थापनाने सिमरनच्या कुटुंबियांकडून एकही पैसे न घेता तिच्यावर उपचार केले आहेत’’, असंही डॉ. नादार यांनी सांगितलं.

तर फॅमिली केअऱ हॉस्पिटलचे संचालक डॉ. जे. बी. भवानी म्हणाले ‘‘ पैशाअभावी अनेक रुग्ण उपचारांपासून वंचित राहतात. वेळीच उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावतात. याचा विचार करून मुलीचा जीव वाचवण्याचा निर्णय हॉस्पिटल प्रशासनाने घेतला. त्यानुसार विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून पैसे जमा केले गेले. अनेक संस्थांना मदतीचं आवाहन करण्यात आलं. त्यानुसार नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.’’

First Published on: March 22, 2019 6:27 PM
Exit mobile version