डहाणूत ११ लाखांची चोरटी दारू जप्त

डहाणूत ११ लाखांची चोरटी दारू जप्त

नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुुरू केलेल्या कारवाईत कारमधून विदेशी दारुची चोरटी वाहतूक होत असल्याचे आढळून आले

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर दमण बनावटीची दारू राज्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे आणली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहिम हाती घेतली असून त्यात चारोटी येथे टाकलेल्या छाप्यात 11 लाख 9 हजार 440 रुपयांची चोरटी दारू हाती लागली. कारवाईत तीन चारचाकी आणि एक मोटारसायकल जप्त करून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक गस्त घालीत असताना काल संध्याकाळी चारोटी, वाणगाव रोड येथे एका संशयास्पद कारला थांबवण्याचा इशारा करताच कारचालकाने सरकारी वाहनाला ठोकर देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या कारचा पाठलाग करून पिंपळशेत खुर्द गावाजवळ कारला पकडण्यात यश आले. कारची तपासणी केली असता त्यात 11 लाख 9 हजार 440 रुपये किंमतीचा विदेशी दारूचा साठा आढळून आला. यावेळी सायमन विष्णू काचरा आणि अजीत लक्ष्या जाधव यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता दारुचा साठा धाकटी डहाणू येथील गोडाऊनमध्ये नेत असल्याची माहिती दिली.

या माहितीच्या आधारे पथकाने धाकटी डहाणू येथील गोडाऊनमध्ये छापा घातला असता त्याठिकाणी आणखी दोन चारचाकी वाहने आणि मोटारसायकलीच्या डिक्कीत दारुचा साठा आढळून आला. चौकशीत विनायक कमळाकर बारी आणि विक्रम दीपक राऊत दमण, खानवेल, दादरा नगर हवेली आणि सेलवासा येथून मोठ्या प्रमाणावर विदेशी दारू बेकायदेशीरपणे आणि महाराष्ट्रात विक्री करीत असल्याचे आढळून आले.

यावेळी पथकाने 11 लाख 9 हजार 440 रुपये किंमतीच्या दारुसह तीन चारचाकी वाहने आणि एक मोटारसायकल मिळून 28 लाख 5 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईची कुणकुण लागताच विनायक बारी आणि विक्रम राऊत फरार झाले. राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक सुभाष जाधव, दुय्यम निरीक्षक आर. ए. काटकर, दुय्यम निरीक्षक एस. आर. मिसाळ, बी. बी. कराड, आर. एम. राठोड, एस.एस. पवार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

First Published on: December 20, 2019 5:02 AM
Exit mobile version