भुकंपाच्या गावात एनडीआरएफचे 200 तंबू

भुकंपाच्या गावात एनडीआरएफचे 200 तंबू

NDRF

डहाणू आणि तलासरी तालुक्यातील भुकंपांच्या गावात सुरक्षेचा उपाय म्हणून एनडीआरएफ मार्फत 200 तंबू उभारण्यात आले असून ग्रामस्थांनी घरात न राहता या तंबूंत आसरा घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.2018 च्या अखेरपासून आतापर्यंत पालघर जिल्ह्यातील तलासरी आणि डहाणू तालुक्याला पन्नासहून जास्त भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्यापैकी धुंदलवाडी सर्वात जास्त धक्के बसले आहेत. या धक्क्यांमुळे काही घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. तर काही घरांची छप्परे कोसळली आहेत. डहाणू तालुक्यातील हळदपाडा-खेवरपाडा येथे बसलेल्या हादर्‍यांमुळे दोन वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. शनिवारी सकाळी वैभवी भुयाळ घराच्या अंगणात खेळत होती. त्यावेळी बसलेल्या हादर्‍यामुळे घाबरून जावून ती घराकडे पळत सुटली. त्यात ठेच लागून ती दगडावर आपटली आणि गतप्राण झाली.

शनिवारी तर एका पाठोपाठ पाचवेळी भुकंपाचे धक्के बसले होते. त्यामुळे येथील शेकडो ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे. ज्यांना स्थलांतर करता आले नाही. ते रात्री घराबाहेर उघड्यावर, थंडीत कुडकुडत रात्र जागून काढत आहेत. अशा लोकांच्या सुरक्षेसाठी पुण्यातील एनडीआरएफची टिम धुंदलवाडीत दाखल झाली आहे. या टिमने ग्रामस्थांसाठी 200 तंबू उभारले असून 32 जवान आणि 4 अधिकारी तैनात केले आहेत. आणखी 42 ठिकाणी असेच तंबू उभारण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी शाळा आणि आश्रमशाळेच्या आवारात तंबू लावण्यात आले असून 3 रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

आतापर्यंत डहाणूमधील 15 आणि तलासरीतील 7 गावे भुकंपामुळे प्रभावित झाली आहेत. या भुकंपाचे कारण शोधण्यासाठी हैद्राबाद आणि दिल्लीतील नॅशनल जिओग्राफीकल रिसर्च इस्टिट्यूटचे तज्ञ भुकंपस्थळी दाखल झाले आहेत. भूकंप होत असल्यामुळे रात्री घराबाहेर झोपण्याचे आवाहन जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी केले आहे. तर ग्रामस्थांच्या मदतीसाठी तलासरी पोलीस ठाण्याचे एक अधिकारी, पाच कर्मचारी आणि 11 जणांचे प्लाटून संपुर्ण परिसरात गस्त घालीत असल्याची माहिती भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी श्रवणदत्त एस. आणि पोलीस उपधिक्षक मंदार धर्माधिकारी यांनी दिली.

First Published on: February 5, 2019 5:12 AM
Exit mobile version